मुंबई: करोना व्हायरसमुळे स्थगित करण्यात आलेला आयपीएलचा १३वा हंगाम सुरु करण्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जोरदार तयारी सुरू केली आहे...
मुंबई:

करोना व्हायरसमुळे स्थगित करण्यात आलेला आयपीएलचा १३वा हंगाम सुरु करण्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जोरदार तयारी सुरू केली आहे. यंदा ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० वर्ल्ड कप पुढे ढकलण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जाते. त्यामुळे बीसीसीआयला आयपीएलचे आयोजन करण्यासाठी वेळ मिळू शकेल.
काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने कोणत्याही परिस्थितीत आयपीएल आयोजन करण्याची तयारी असल्याचे म्हटले होते. स्पर्धा रिकाम्या मैदानात प्रेक्षकांशिवाय घ्यावी लागली तरी चालेल पण आयपीएल आयोजन करूच असे देशातील सर्व राज्यातील क्रिकेट बोर्डांना लिहलेल्या पत्रात गांगुलीने म्हटले होते. विशेष म्हणजे आजच (मंगळवारी) क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यावर्षी आयसीसी टी-२० वर्ल्ड कप होणे शक्य नसल्याची कबूली दिली आहे. वर्ल्ड कपचे आयोजन होणे ही गोष्टी खुपच अवघड आहे. १६ संघांना ऑस्ट्रेलियात आणणे सोपी गोष्ट नाही. कारण अनेक देशात अद्याप करोना व्हायरस आहे, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे चेअरमन अर्ल एडिंग्स म्हणाले.
मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएल २०२०चे आयोजन २६ सप्टेंबरपासून सुरू होऊ शकते. स्पर्धाचा कालावधी ८ नोव्हेंबरपर्यंत असू शकतो. ऑस्ट्रेलियात १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या काळात वर्ल्ड कप नियोजित आहे. पण करोनामुळे ही स्पर्धा स्थगित किंवा रद्द होऊ शकते. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आयपीएलमधील अधिकतर सामने दक्षिण भारतात होऊ शकतात. कारण त्या भागात मान्सून अधिक सक्रिय नसेल.
अशा परिस्थितीत चेन्नई आणि बेंगळुरू या दोन शहरात पहिल्या आणि अंतिम सामन्यासाठी मोठी चुरस असेल. आयपीएलच्या पहिल्या आणि अखेरच्या सामन्यासाठी बीसीसीआयची पहिली पसंद मुंबई होती. पण मुंबईत करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे परिस्थितीत सुधारणा झाली तर काही सामने मुंबई होतील, असे बीसीसीआयचे नियोजन आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत