अहमदनगर : वेबटीम केंद्र सरकारचा कोविड निधी खर्च करीत असताना प्रशासन आम्हाला एकदाही विचारत नाही, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. कोविड फ...
अहमदनगर : वेबटीम केंद्र सरकारचा कोविड निधी खर्च करीत असताना प्रशासन आम्हाला एकदाही विचारत नाही, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. कोविड फंडाबाबत खासदारालाच सूचना करण्याचा अधिकार नसेल, तर आम्ही राजीनामाच देऊन टाकतो,’ असे परखड मत खासदार डॉ. सुजय विखे यांनी मांडत जिल्हा प्रशासनावर जोरदार टीका केली. ‘येथून पुढे निवडणुकीला सुद्धा जिल्हाधिकारी, प्रातांधिकारी, तहसिलदार यांनाच उभे करावे,’ असेही ते म्हणाले.
खासदार विखे म्हणाले, ‘कोविड फंड म्हणून नगर जिल्ह्यासाठी केंद्र सरकारकडून अठरा कोटी रुपये आले. या निधीचा खर्च कसा झाला पाहिजे, हे देखील सांगण्यात आले होते. पण केंद्राकडून आलेल्या या निधीचा खर्च करीत असताना एकदाही खासदाराला विश्वासात घेतले जात नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. चार ऑगस्टला आमची आरोग्य कमिटीची मिटींग असून त्यामध्ये मी हा मुद्दा मांडणार आहे. जर कोविड फंड हा केंद्र सरकारचा आहे, आणि त्यात खासदाराला सूचना करण्याचा अधिकार नसेल तर आम्ही राजीनामा देऊन टाकतो. आम्ही कशाला निवडून आलो ? आमच्या कुटुंबाने कशाला पन्नास वर्ष या जिल्ह्यातील राजकारणात जनतेसाठी घातली ? मी कशाला तीन-चार वर्ष मेहनत घेऊन निवडणूक लढवली ? असा सवाल उपस्थित करीत मी निवडणूक जिंकून खुर्चीवर बसलो आहे. कोणतीही स्पर्धा परीक्षा देऊन खुर्चीवर बसलो नाही,’ असा टोलाही त्यांनी अधिकाऱ्यांना लगावला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत