नेवासा : प्रतिनिधी
नेवासा : प्रतिनिधी
आज महाराष्ट्रामध्ये कोरोना संकटामुळे सर्व व्यवसाय डबघाईला आले असून फक्त शेती व्यवसाय शेतकऱ्यांच्या कष्टावर चालू आहे व त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था काही प्रमाणात सावरण्याची मौल्यवान काम शेतीव्यवसाय करत आहे. अशातच रासायनिक खतांच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
खरीप हंगाम तोंडावर शेतीसाठी नवीन जातीची बी बियाणे, खते, जैविक व रासायनिक खते तसेच कीटकनाशके व मजुरीसाठी आर्थिक पुरवठा या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. शेतकऱ्यांचा रासायनिक खतांवरील खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. आता अचानक रासायनिक खतांचे भाव वाढल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. शेती व्यवसाय सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी जुन्या दरानेच शेतकऱ्यांना रासायनिक खते द्यावीत अशी विनंती कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी केली आहे.
अशीच परिस्थिती राहिली तर शेती उत्पादनात घट होईल व अन्नधान्याचा तुटवडा कोरोना काळात भयावह राहील याची दखल घेणे काळाची गरज आहे.
रासायनिक मिश्र खते १०:२६:२६ याची किंमत ११७५ वरून १७७५ तर १०:३२:१६ याची किंमत ११९० वरून १८०० तसेच आयपीएल डी ए पी किंमत रुपये १२०० वरून १९०० वर होणार आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात डीएपी वापरतात त्यामुळे कडधान्याचे उत्पादन तेलबिया उत्पादनात भरीव वाढ होते. शेती व्यवसाय फक्त शेतकऱ्यांच्या कष्टावर उभा आहे. शेतमालाला भाजीपाल्याला दुधाला कोरोनामुळे योग्य भाव मिळालेला नाही ही दुर्दशा असतांनाच रासायनिक खतांच्या किमतीत केलेली ५० ते ६० टक्के वाढ मागे घ्यावी व जुन्या दराने रासायनिक खतांचा पुरवठा व्हावा म्हणजे शेती व्यवसायाला उभारी मिळेल अन्यथा मुख्य व्यवसाय शेती अधिक संकटग्रस्त होईल अशी साधार शंका डॉ. ढगे यांनी व्यक्त केली आहे. आता आंदोलने करण्याची वेळ नसून शेतकरीही खरीप हंगामाच्या तोंडावर कामात व्यस्त आहे. याचा विचार करून रासायनिक खताच्या वाढलेल्या किंमती अमलात आणू नये असे मागणी कृषीशास्त्रज्ञ डॉ.अशोक ढगे यांनी केंद्र सरकारकडे विनंतीरूपी मागणी केली आहे.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. उलटपक्षी रासायनिक खताच्या किंमती भरमसाठ वाढून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. जुन्या दरानेच रासायनिक खते शेतकऱ्यांना मिळावेत अन्यथा नेवासा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन केले जाईल. काशिनाथ नवले, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस


कोणत्याही टिप्पण्या नाहीत