कोपरगाव/वेबटीम:- येथील प्रशासन, व्यापारी, व्यावसायिक व जनतेच्या सहकार्यामुळे शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला गेला आहे. गेल्या 15 ...
कोपरगाव/वेबटीम:-
येथील प्रशासन, व्यापारी, व्यावसायिक व जनतेच्या सहकार्यामुळे शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला गेला आहे. गेल्या 15 दिवसांच्या जनता संचारबंदीमुळे रुग्णसंख्या वेगाने कमी झाली असून, मृत्यूचे प्रमाणही घटले आहे. त्यातच दीड वर्षांपासून सर्वांच्याच जीवनावर विपरित परिणाम झालेला असल्याने सर्वांचे आर्थिक नियोजन कोलमडून पडले आहेत. यामुळे दैनंदिन गरजा भागविणेही कठीण झाल्याने जिल्हा प्रशासनाने असंतोषाचा स्फोट टाळण्यासाठी जनभावनेचा विचार करुन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केली आहे.
मंगळवारी (ता.1) शहरातील व्यापारी संघटनांची बैठक झाली. या बैठकीत व्यापारी संघटनेचे काका कोयटे, सुधीर डागा व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्याशी संपर्क करून कोपरगावचे सर्व व्यवहार पुन्हा सुरू करण्याची विनंती केली. परंतु, त्यांनी सध्या असमर्थता दाखवली. मात्र येत्या शुक्रवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत पुन्हा आढावा घेतला जाणार आहे. त्यातून सकारात्मक निर्णय होण्याचे संकेत आहे. तत्पूर्वी कोपरगावचे व्यावसायिक व नागरिक नेहमीच प्रशासनाला सहकार्य करत आले आहेत. सध्या येथील कोविड स्थिती पूर्णतः नियंत्रणात आहे. त्यामुळे यापुढेही कोपरगावकर प्रशासनाला सहकार्य करतील. परंतु, आर्थिक गणित जुळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही बंधने घालून व्यवहार सुरळीत करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत