श्रीरामपूर(वेबटीम) सर्वत्र वटसावित्री पौर्णिमा सण आज उत्साहात साजरा होत असताना श्रीरामपूर शहरात वटपूजनाचे साहित्य विक्री करून आपले पोट चालवि...
श्रीरामपूर(वेबटीम)
सर्वत्र वटसावित्री पौर्णिमा सण आज उत्साहात साजरा होत असताना श्रीरामपूर शहरात वटपूजनाचे साहित्य विक्री करून आपले पोट चालविणाऱ्या महिलेचे पूजेचे साहित्य श्रीरामपूर पोलिसांनी जप्त केले असून पोलिसांना खुलेआम श्रीरामपूर शहरात अवैध धंदे सुरू असल्याचे दिसत नाही का? हातावर पोट असलेल्या गरिबांना हा जाणीवपूर्वक त्रास असून याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय मकासरे यांनी केली.
याबाबत माहिती देताना डॉ.मकासरे यांनी सांगितले की, श्रीरामपूर शहरात वटपौर्णिमा पूजेचे साहित्य एक महिला रस्त्याच्या कडेला विक्री करत असताना पोलिसांनी सदर ठिकाणी येऊन सर्व साहित्य उचलून पोलीस ठाण्यात जमा केले. सदर महिलेने सदर साहित्य साठी मी काही प्रमाणात भांडवल गुंतवले आहे, त्यामुळे मला विक्रीसाठी जे साहित्य आपण जप्त केले ते द्या, अगदी हातजोडून महिलेने विनंती केली. परंतु पोलिसांनी सगळं साहित्य पोलीस वाहनात टाकून ठाण्यात जमा केले.
श्रीरामपूर शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे जोमात सुरू असून त्याकडे पोलिसांचे 'अर्थ'पूर्ण असलेल्या हितसंबंधामुळे कानाडोळा केला जातो. मात्र हातावर पोट असलेल्या गरिबांना जाणीवपूर्वक त्रास दिला होता. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून सदर महिलेला न्याय द्यावा अशी मागणी डॉ. मकासरे यांनी केली आहे.
सदर महिलेने पूजेचे साहित्य विक्रीसाठी २ हजार रुपयांचा माल खरेदी केला होता. तो विकून त्या महिलेला व्यापाऱ्याला २ हजार देणेदारी होती. एक रुपया विक्री न होता सर्व माल पोलिसांनी जप्त केल्याने त्या महिलेने हतबल होऊन सदर घडलेला प्रकार रडून रडून डॉ.मकासरे यांना सांगीतला. त्यावर डॉ.मकासरे यांनी तुम्ही रडू नका, मी तुम्हाला २ हजार रुपये पोहच करतो, अशा शब्दात धीर देऊन तिला मदतीसाठी हात पुढे केला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत