कोपरगाव/प्रतिनिधी:- कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न अवघ्या राज्यात गाजलेला आहे. याबद्दल सत्ताधारी आणि विरोधकांत कायमच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झ...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न अवघ्या राज्यात गाजलेला आहे. याबद्दल सत्ताधारी आणि विरोधकांत कायमच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आलेल्या आहेत. यातच आता ऐन पावसाळ्यातही आठ दिवसाआड होणारा पाणी पुरवठा चार दिवसांआड करण्यात आला आहे. या निर्णयाचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी स्वागत करून ४२ कोटी रुपयांच्या नूतन पाणी योजनेची चाचणी का करत नाही?असा प्रतिसवाल करून टीकास्त्र सोडले आहे.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, ५ ऑक्टोबर, २०२१ पासून ऐन पावसाळ्यात कोपरगाव शहराला चार दिवसांआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. याचे स्वागत करतो, परंतु ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात नदी व कालव्याला पाणी असताना देखील का दिले नाही. शिवाय ४२ कोटी रुपयांच्या नूतन पाणी योजनेची देखील चाचणी घेत नाहीत. यामुळे पुन्हा चाचणीसाठी नवीन रस्ते फोडावे लागतील आणि पालिकेचे नुकसान होईल.
ही केवळ निवडणुकीसाठी जुमलेबाजी असून, शहरवासियांच्या डोळ्यात धूळफेक आहे. याचा नागरिकांनी विचार करून पालिकेला जाब विचारावा असे आवाहनही मंगेश पाटील यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत