शिंगवे-वांबोरी रस्ताकामावरून श्रेयवाद उफाळला - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शिंगवे-वांबोरी रस्ताकामावरून श्रेयवाद उफाळला

पारनेर/वेबटीम:-     तालुक्यातील शिंगवे नाईक येथे आमदार नीलेश लंके यांच्या स्थानिक विकास निधीतून सुमारे सहा कोटी रुपयांची विकासकामे मंजूर होऊ...

पारनेर/वेबटीम:-

    तालुक्यातील शिंगवे नाईक येथे आमदार नीलेश लंके यांच्या स्थानिक विकास निधीतून सुमारे सहा कोटी रुपयांची विकासकामे मंजूर होऊन त्यातील बरीच कामे पूर्णत्वास गेली आहेत. गावातील विकासकामांसाठी आम्ही वेळोवेळी आ. लंके यांच्याकडे पाठपुरावा केला. त्याची दखल घेत आ. लंकेंनी गावासाठी भरघोस विकासकामे मंजूर करून पूर्णत्वास आणली. काही दिवसांपूर्वी शिंगवे ते वांबोरी रस्ता या रस्ताकामाची आम्ही मागणी केली असता आ. लंकेंनी त्यासाठी पाठपुरावा करून साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. परंतु गावातील काही हौश्या-नवश्या कार्यकर्त्यांच्या मदतीने खासदार डाॅ. सुजय विखे हे आ. लंके यांनी मंजूर केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहेत. खा. विखेंनी खरंच विकास करायचा असेल तर नगर-मनमाड महामार्गाची दुरवस्था व त्यावर जाणा-या निष्पापांच्या बळींचा विचार करून महामार्गाची अवस्था सुधारून विकास कामे करून दाखवावीत. उगाच आ. लंके यांनी मंजूर केलेल्या कामाचे श्रेय घेऊन आम्ही विकास घडवून आणलाय असा फुकटचा आव आणू नये, अशी टीका शिंगवे नाईकचे माजी उपसरपंच हरिदास जाधव यांनी केली आहे.

शिंगवे नाईक येथे रविवार, दि. 1 आॅक्टोबर रोजी पाच कोटी 31 लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे. त्यात शिंगवे नाईक ते वांबोरी या तीन किलोमीटर रस्ताकामाचा समावेश असून, तीन कोटी रुपये खर्चाच्या या कामासाठी आ. लंके यांनी मंजुरी व निधी आणल्याचा दावा जाधव यांनी केला आहे.. या कामावरून श्रेयवाद उफाळून आला असून, याबाबत जाधव यांनी सांगितले की, आ. लंके यांनी मंजूर केलेल्या विकासकामांचे श्रेय घेण्याचा खा. विखेंचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. परंतु जनता सुज्ञ आहे. खा. विखे  यांनी आ. लंकेंनी मंजुरी आणलेल्या कामांची उदघाटने करण्याचा सपाटा लावला आहे. त्यांचे वडील जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे आपल्या वडिलांच्या पदाचा गैरवापर करून ते सरकारी यंत्रणेवर दबाव आणत आहेत. परंतु आपण शंभर टक्के आमच्या गावाला निधी द्यावा किंवा आमच्या गावातील तुमच्या कार्यकर्त्यांनी तुमच्याकडून विकास कामासाठी निधी उपलब्ध करून गावाचा विकास करावा. आम्ही जसा आ. लंके यांच्याकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करतो, त्यापेक्षा तुमच्या कार्यकर्त्यांनी तुमच्याकडून जास्त निधी उपलब्ध करून गावाचा सर्वांगीण विकास करावा. यात आम्हाला आनंदच होईल आणि आम्ही स्वतः पुढे येऊन तुमचा खूप मोठा नागरी सत्कार करू. परंतु तुम्ही आ. लंकेंनी मंजूर केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय घेऊन लोकांना वेड्यात काढायचे धंदे बंद करावेत. जनता सुज्ञ आहे. केवळ शिंगवे नाईकच नाही तर नगर तालुक्यातील व पारनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पदाचा गैरवापर करून खा. विखे हे आ. लंकेंच्या कामांचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत, अशी टीकाही हरिदास जाधव  यांनी केली आहे. 




आ. लंकेंनी दिलेल्या मागणीपत्राचा

सरपंच काळेंनी सादर केला पुरावा!

शिंगवे नाईक ते वांबोरी रस्ता हा आ. लंके यांनीच मंजूर करून तीन कोटी रुपयांचा निधी आणला. हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झालेला असून, याबाबत आमदार लंके यांनी शासनाकडे दिलेल्या मागणीपत्राचा पुरावा शिंगवे नाईकच्या सरपंच सौ. जिजाबाई काळे यांनी सादर केला. गावातील काही कर्तृत्वशून्य लोक हा रस्ता खा. विखे यांनी मंजूर करून आणला असे दाखवून त्यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन करणार आहेत. हा रस्ता आपण मंजूर केलेला नाही, हे खा. विखे यांना  स्वतःलाही माहित आहे. रस्तामंजुरीचे योगदान आ. लंके यांचेच आहे. त्यामुळे जनाची नाही, तर मनाची या उक्तीप्रमाणे  लंकेंनी मंजूर केलेल्या रस्ताकामाचे उद्घाटन खा. विखे यांनी करू नये, असे आवाहनही सरपंच जिजाबाई काळे यांनी केले आहे.  



ग्रामस्थांच्या वतीने

करणार निषेध

न केलेल्या कामाचे श्रेय घेऊन उद्घाटन करण्याच्या प्रकाराचा समस्त शिंगवे नाईक ग्रामस्थांच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करणार आहोत. आधी गावासाठी विकास कामे मंजूर करा आणि त्याची उद्घाटने थाटामाटात करा. त्यासाठी आम्ही सर्वात पुढे उभे राहू. परंतु न केलेल्या कामाचे श्रेय घेऊन लोकांना वेळेत काढायचे धंदे बंद करा, असेही माजी उपसरपंच हरिदास जाधव यांनी म्हटले आहे. 



या विकासकामांचे रविवारी

शिंगवेत होणार उद्घाटन 

खासदार डॉ. सुजय विखे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या 5 कोटी 31 लक्ष रुपयांचा विविध विकास कामांचा  भूमिपूजन समारंभ शिंगवे नाईक येथे रविवार, दि. 1 आॅक्टोबर रोजी दुपारी होणार आहे. माजी मंत्री शिवाजी कर्डिले व खासदार विखे यांच्या हस्ते श्रीराम मंदिर सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कामांमध्ये 1) मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून इजिमा 293 शिंगवे वांबोरी 3 किलोमीटर रस्ता (रक्कम -3 कोटी 1 लक्ष रुपये), २) राष्ट्रीय जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याची पाईपलाइन व टाक्या (रक्कम 2 कोटी 16 लक्ष रुपये). 3) शिंगवे स्मशानभूमी भूमिपूजन (रक्कम 10 लक्ष रुपये), 4) कोळ्याची वाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजिटल क्लासरूम (रक्कम 4 लक्ष रुपये) या कामांचा समावेश असून, त्यातील शिंगवे-वांबोरी रस्त्याचे तीन कोटींचे काम आ. लंकेंनी मंजूर केल्याचा दावा समर्थकांनी केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत