देवळाली प्रवरा : (प्रतिनिधी ) शासन दरबारी जवळपास चव्वेचाळीस वर्षांपासून श्रीरामपूर जिल्हा व्हावा हि मागणी प्रलंबीत आहे. मध्यंतरी शासनाकडून ज...
देवळाली प्रवरा : (प्रतिनिधी)
शासन दरबारी जवळपास चव्वेचाळीस वर्षांपासून श्रीरामपूर जिल्हा व्हावा हि मागणी प्रलंबीत आहे. मध्यंतरी शासनाकडून जिल्हा विभाजनाची अपेक्षा होती. मात्र शासनाने जिल्ह्याचे अहिल्यानगर नामांतर केल्याने ऐरणीवर आलेला जिल्हा विभाजन सामाजिक प्रश्न प्रलंबित राहिला. या पार्श्वभूमीवर शासनाने निकषाचे आधारे आणि सर्वात कमी खर्च येणारा श्रीरामपूर जिल्हा लवकरच जाहिर करावा. तसेच राहुरी तालुक्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाला जोडलेल्या दुर्लक्षित 32 गावांच्या मध्यवर्ती असलेला देवळाली- श्रीशिवाजीनगर तालुका होण्यासाठी श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सत्कार करून साकडे घातले. यावेळी राष्ट्रवादी प्रदेश सदस्य अजित कदम,भास्कर कोळसे,प्रा.अरविंद सांगळे,शामकांत खडके,महेश औटी ,अनिस पठाण योगेश सिनारे,मयूर कदम,संतोष धनवटे इत्यादी उपस्थित होते.
प्रसिद्धी पत्रकात राजेंद्र लांडगे म्हणाले, अहिल्यानगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ गोवा राज्या पेक्षा पाच आणि दिल्ली राज्यापेक्षा अकरा पट मोठे आहे. यामुळे आपत्कालीन काळात प्रशासनावर नेहमीच ताणतणाव येऊन धावपळ होते. जिल्ह्यासाठी बहुतांशी कार्यालये निकषाच्या आधारे शहरात कार्यान्वित असल्याने श्रीरामपूर जिल्हा होणं सर्वांचे हितावह राहिल.
तसेच श्रीरामपूर जिल्हा आणि देवळाली- श्रीशिवाजीनगर तालुका झाल्यास गेलेलं वैभव पुन्हा प्राप्त होईल.नवनवीन उद्योगधंदे सुरू येतील. त्यातून रोजगाराच्या संधी प्राप्तीनंतर सर्व सामान्यांच्या क्रय शक्तीत देखील वाढ होईल.
तसेच देवळाली- प्रवरा नगर परिषदेची सन 1982 ची स्थापना आहे. तब्बल बेचाळीस- त्रेचाळीस वर्षामध्ये देवळाली-प्रवरा तालुका न झाल्याने सर्वत्र कोणत्याही प्रकारचे उदयोगधंदे आले नाहीत. पर्यायानी सर्वसामान्य जनतेला भरमसाठ घरपट्टी, पाणीपट्टीमुळे निष्कारण भुर्दंड सहन करावा लागत आहे. शासनाने देवळाली- श्रीशिवाजीनगर तालुका निर्माण केल्यास परिसराला खऱ्या अर्थाने गतवैभव प्राप्त होईल. त्याच बरोबर दुर्लक्षित 32 गावांना देखील न्याय मिळेल अशी सर्व जनतेची धारणा झाली आहे. एकंदरीत श्रीरामपूर जिल्हासह देवळाली- श्रीशिवाजीनगर तालुका करण्याचा ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय ठरेल. अतिव्यस्ततेतुन देखील दादांनी श्रीरामपूर जिल्हा आणि देवळाली- श्रीशिवाजीनगर तालुका मागणीला प्रतिसाद दिल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे राजेंद्र लांडगे यांनी शेवटी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत