देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा शहरात महावितरणचा विद्युत पुरवठा खंडित झाला की त्याचा थेट परिणाम मोबाईल नेटवर्कवर होत असल्याची तक्रार ज...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा शहरात महावितरणचा विद्युत पुरवठा खंडित झाला की त्याचा थेट परिणाम मोबाईल नेटवर्कवर होत असल्याची तक्रार जिओ ग्राहकांकडून केली जात आहे. वीजपुरवठा बंद होताच संबंधित जिओ टॉवरचे नेटवर्क बंद पडते आणि त्यामुळे मोबाईल रेंजसोबतच इंटरनेट सेवा देखील ठप्प होत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
वीज नसताना मोबाईलवर कॉल करणे, कॉल रिसिव्ह करणे तसेच इंटरनेटचा वापर करणे अवघड होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः वीजपुरवठा काही तास खंडित राहिल्यास परिस्थिती अधिक गंभीर बनते.
टॉवरला पुरेसा बॅटरी बॅकअप किंवा पर्यायी वीजव्यवस्था का नाही? असा सवाल आता जिओ ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे. जिओच्या उपलब्ध अधिकृत कागदपत्रांमध्ये काही टॉवर साइट्सवर वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर लिथियम-आयन बॅटरीचा वापर तसेच पर्यायी ऊर्जा व्यवस्थेचा उल्लेख आहे.
त्यामुळे देवळाली प्रवरा परिसरातील संबंधित टॉवरवर पुरेशा क्षमतेची बॅटरी बॅकअप व्यवस्था आहे का, ती कार्यरत आहे का आणि वीज गेल्यानंतर ती किती काळ नेटवर्क सेवा सुरू ठेवू शकते, याची जिओ कंपनीने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.
दरम्यान, वारंवार नेटवर्क बंद पडत असल्याने अनेक ग्राहक मोबाईल नंबर दुसऱ्या कंपनीत पोर्ट करण्याच्या मनस्थितीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी जिओने देवळाली प्रवरा परिसरातील नेटवर्क समस्येकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत