राहुरी (प्रतिनिधी) राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागाच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी टंचाई...
राहुरी (प्रतिनिधी)
राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागाच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी टंचाई आढावा बैठकीत आग्रही भूमिका मांडली. पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कुरणवाडी व १९ गावे तसेच बारागाव नांदूर व १४ गावे या दोन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी आमदार कर्डिले यांनी विशेष आग्रही भूमिका घेतली. या दोन्ही योजनांसाठी अनुक्रमे ४५ लाख व ४४ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, दुरुस्तीच्या कामांना लवकरच प्रशासकीय मान्यता देण्यात येणार असल्याचे आ.अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टंचाई आढावा बैठकीस सभापती राम शिंदे, आमदार अक्षय कर्डिले, आमदार काशिनाथ दाते, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार विठ्ठलराव लंघे, जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
राहुरी तालुक्यातील कुरणवाडी व १९ गावे तसेच बारागाव नांदूर व १४ गावे या पाणीपुरवठा योजना परिसरातील अनेक गावांसाठी जीवनवाहिनी ठरल्या आहेत. मात्र, योजनांच्या देखभाल व दुरुस्तीअभावी पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर संबंधित योजनांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अक्षय कर्डिले यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन आमदार कर्डिले यांनी टंचाई बैठकीत हा विषय प्राधान्याने मांडला. दोन्ही योजनांच्या दुरुस्तीसाठी निधीची आवश्यकता स्पष्ट करत त्यांनी तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.
आमदार कर्डिले यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्री विखे पाटील यांनी बारागाव नांदूर व १४ गावे योजनेसाठी ४४ लाख रुपये, तर कुरणवाडी व १९ गावे योजनेसाठी ४५ लाख रुपये निधी मंजूर केला. तसेच या दोन्ही योजनांच्या दुरुस्तीच्या कामांना लवकरच प्रशासकीय मान्यता देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संबंधित गावांतील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक प्रभावीपणे मार्गी लागण्याची अपेक्षा आहे.
मुळा डाव्या कालव्याचे आवर्तन २० डिसेंबरला
दरम्यान, रब्बी हंगामातील पिकांसाठी मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून आवर्तन सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी आमदार अक्षय कर्डिले यांच्याकडे केली होती. शेतकऱ्यांची पाण्याची गरज आणि पिकांची परिस्थिती लक्षात घेऊन आमदार कर्डिले यांनी टंचाई बैठकीत हा प्रश्नही उपस्थित केला. त्यावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मक निर्णय घेत २० डिसेंबर रोजी डाव्या कालव्यातून आवर्तन सोडण्यास मान्यता दिली.
ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांच्या दुरुस्तीसाठी ८९ लाख रुपयांचा निधी आणि शेतकऱ्यांसाठी मुळा डाव्या कालव्याचे आवर्तन यामुळे राहुरी तालुक्यातील नागरिक व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. स्थानिक प्रश्नांची दखल घेऊन ते शासनदरबारी मांडत त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आमदार अक्षय कर्डिले यांनी घेतलेला पुढाकार या बैठकीतून अधोरेखित झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत