पुर्वीची अबला स्त्री ही केव्हाच सबला झाली असली तरी ती आता बचत गटाच्या माध्यमातून आणखी सक्षम झालेली दिसत आहे. तालुक्यातील 17 गावात 300 ब...
पुर्वीची अबला स्त्री ही केव्हाच सबला झाली असली तरी ती आता बचत गटाच्या माध्यमातून आणखी सक्षम झालेली दिसत आहे. तालुक्यातील 17 गावात 300 बचत गटांच्या माध्यमातून तीन हजारांपेक्षा अधिक महिला शासनाच्या मदतीतून थेट उद्योजक बनल्या आहेत. आता राहुरीतून सिनेटरी नॅपकीनसह आवळा कॅण्डी, पापड, लोणचे, स्टेशनरी, कटलरी, खाद्य पदार्थ, दैनंदीन वापराच्या वस्तुंची निर्मिती होवून त्यास राज्यासह परराज्य आणि परदेशातही बाजारपेठ उपलब्ध होताना दिसत आहे.
बांगलादेशात नोबेल पुरस्कार विजेते व बचत गटांच्या चळवळीचे जनक डॉ. महंमद युनूस यांनी राबविलेल्या बचत गटाच्या प्रयोगाला बांगलादेशात अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर या यशातून प्रेरणा घेऊन भारतानेही बचत गटांच्या माध्यमातून लघुत्तम उद्योगांना चालना दिली. भारतात 1992 च्या दरम्यान बचत गटाच्या चळवळीला खरा वेग आला. ही चळवळ पाहता पाहता महाराष्ट्रात व्यापक स्वरूपात पसरली अन ती राहुरी तालुक्यापर्यंत येवून धडकली.
वास्तविकतः बचत गटांच्या स्थापनांमुळे बचतीच्या सवयीबरोबरच स्वयंरोजगार करण्याची प्रेरणा महिलांना मिळाली आहे. चूल आणि मूल इतकेच विश्व असणार्या महिला आज बचत गटाच्या माध्यमातून उद्योजक बनल्या असल्याचे राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागात दिसून येते. ब्राम्हणी येथील बचत गटाने सिनेटरी नॅपकीनचा प्रकल्प सुरू करून राज्यात नावलौकीक मिळवला. तसेच अनेक गटांनी आवळा कॅण्डी, विविध पदार्थ, दैनंदीन वापरातील वस्तूंची निर्मीती करून स्वयंरोजगार निर्माण केलेला आहे. त्यांनी तयार केलेल्या उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळावी म्हणून शासनही प्रयत्नशील आहे. तसेच, संवादकौशल्य, वेळेचे नियोजन, अर्थकारणाचा अभ्यास, जबाबदारीची जाणीव, नेतृत्व गुण यामुळे महिलाही पुरुषांपेक्षा कुठे कमी नाहीत हेच बचत गटांतून दिसले आहे. दरम्यान, बचत गट चांगल्या प्रकारे कार्यरत असताना काही दिवसांपासून मायक्रो फायनान्सने तालुक्यात मोठा धुडगूस घातला. तात्काळ कर्ज मिळत असल्याने महिला या आर्थिक चक्रव्यूहात फसल्या. त्यामुळे शासनाचे बचत गट अडचणीत सापडण्याचा धोका होता. मात्र, ‘प्रतीभा’च्या अधिकारी आणि पदाधिकार्यांनी महिलांना त्यांची होणारी फसवणूक याशिवाय बचत गटाच्या माध्यमातून मिळणार्या योजना, सुलभ कर्ज, त्यासाठीचे अनुदान, उत्पादित मालाला मिळणारी बाजारपेठ याबाबतचे फायदे स्पष्ट करून बचत गट वाचवलेच नाही तर यातून आणखी ही संख्या वाढवली आहे. त्यामुळे आजही तालुक्यात 300 पेक्षा अधिक गट कार्यरत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत