कुस्तीच्या आखाड्यात एखादा पैलवान मोठे प्रयत्न करूनही पडत नसेल तर त्याच्या डोळ्यात माती टाकून त्याला पाडणे हा सोयीचा मात्र रडीचा डाव, आता ...
कुस्तीच्या आखाड्यात एखादा पैलवान मोठे प्रयत्न करूनही पडत नसेल तर त्याच्या डोळ्यात माती टाकून त्याला पाडणे हा सोयीचा मात्र रडीचा डाव, आता राजकारणातही वापरला जाऊ लागला आहे. राहुरीच्या राजकीय आखाड्यातही एक मल्ल असाच काहींनी एकत्र येत डावपेच करून चितपट केला, आता यात विरोधी मल्लाचा विजय झाला हे जरी सत्य असले तरी पडलेले नामांकित, अनुभवी पहिलवान इतके गाफील कसे, ते या डावात कसे फसले ? हे कोडे मात्र न उलगडण्यासारखे आहे. होय, आमदार शिवाजीराव कर्डीले हे खरोखरच लालमाती बरोबरच राजकारणातील एक मूर्रबी पैलवान होते, ज्या वेळी हे पैलवान डोईजड झाल्यासारखे काहींना वाटले, आणि सरळ सरळ कुस्तीत हा पहिलवान आताही काही पडणार नसल्याचे समजल्यावर त्याला मैदानात डोळ्यात माती टाकून पडण्याचा 'डाव' यशस्वी झाला. ही राजकीय माती 'प्रवरेच्या' पट्यातील आणि काहीशी 'भगवी' असल्याने ती फेकताना विरोधी मल्लला काही त्रास झाला नाही. खर पाहिले तर, आमदार कर्डीले हे जिल्ह्यात आपल्याला वरचढ झाल्याची भावना काहींना झोपू देत नव्हती, लोकसभा निवडणुकीतही ते काहीं अंशी दिसून आले होते, तत्पूर्वीही जिल्हा बँक असो, त्यातील कारखाना कर्ज पुरवठा, कुठं कर्ज पुनर्गठन बाबतही कर्डीलेनी मदतीची भावना दाखवली असली तरी, त्यांच्याकडून कळत नकळत काहींच्या भावना दुखावल्या होत्या, जिल्हा परिषदेतही त्यांचा वरचष्मा वाढत होताच, भाजपातही एकाच वेळी ते मुंडे आणि फडणवीस या दोन्ही गटाकडून खेळत होते, त्यांमुळे राजकारणातील त्यांची मुसदेगिरी लपून राहिली नव्हती,त्यांच्या दूरदृष्टी राजकारणामुळे ते अपराजित होते, दादा पाटील शेळके, शंकरराव गडाख या दिगज्जना पराजित करून त्यांनी पाय रोवले, पुढे माजी खा बापूसाहेब तनपुरेना पाडून त्यांनी राहुरीत वर्चस्व प्रस्थापित केले, यासाठी प्रवरेच्या मदत आणि काही राहुरीतून छुपे हात त्यांच्या मदतीला आले, त्यानंतही त्यांनी उषाताई तनपुरे यांचा पराभव करून विजयरथ सुरूच ठेवला, त्यावेळीही त्यांना परकीय शक्तीची साथ मिळाली, त्यामुळे कर्डीले यांची आमदारकी ही प्रवरेच्या रसदिवर काहीशी अवलंबून बसली होती, त्यात राहुरी कारखान्यास मदत करून त्यांनी जनतेची मदत केली असली तरी ती त्यांची सर्वात मोठी राजकीय चूक ठरली , असेही बोलले जात आहे, कारण तेव्हापासून कर्डीले यांची राहुरीवरील पकड ढिली झाली. पूर्वीचे विकास मंडळ कार्यकर्ते मध्यंतरी कर्डीले यांच्याकडे आले होते, मात्र कारखाना सुरू होताच विकास मंडळाचे परिवर्तन झाले आणि राहुरीच्या राजकारणाची सूत्रे आपोआपच विखे घराण्याकडे आले, आता त्यांनतर पडद्याआड आणि पडद्याबाहेर काय झाले, सर्वांनी पाहिले.मात्र तरीही जिल्ह्यात कर्डीले हे मोठे नेते बनले होते, त्यांचे राजकीय वजन कायम होते, महापालिका निवडणुकीत त्यांनी भाजपचा महापौर बनवून मुंबईतून पाठीवर शाबासकी मिळवली होती, यातून काहींना त्याचवेळी संभाव्य धोका जाणवला होता, मात्र लोकसभे नंतर कर्डीले यांना छुपा विरोध वाढला होता. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळवण्यापासून संघर्ष करावा लागला, त्यात त्यांनी स्वकीय आणि परकीयांचा विरोध असतानाही उमेदवारी खेचून आणली, त्यामुळे आता त्यांना राजकारणातून कायमचे संपवण्यासाठी अनेक हात बाहेर आले, त्यात कुणाला विधान परिषद निवडणुकीतील बदला घ्यायचा होता, तर कुणाला लोकसभेचा वचपा काढायचा होता. परिणामी कर्डीले यांना एकाच वेळी या दोन्ही विरोधकांचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे लोकसभेला विखेनी राहुरी कारखानाचे ऐनवेळी पेमेंट करून राजकीय फायदा उचलला होता, अगदी त्याचप्रमाणे प्राजक्ततनपुरे यांनीही विधानसभेच्या मतदानापूर्वी पेमेंट केल्यानं हा योगायोग जुळून आला होता, कुणी याला लोकसभेची परतफेड बोलत आहे, तर कुणी ..! असो, कर्डीले पडले, खरतर त्यांना अंतर्गत विरोधाची माहिती होती की नाही हा एक प्रश्न आहेच, मात्र जर त्यांना माहिती नसेल तर मात्र ऐनवेळी दगाफटका झाल्याची भावना त्यांच्या मनात धुसफूस करत असेल आणि जर हा विरोध त्यांनी गृहीत धरूनही 'त्या' लोकांकडून मदतीची अपेक्षा केलेली असलं तर मात्र त्यांनी हिटविकेट टाकली असे म्हणावे लागेल, मात्र सध्याच्या चर्चेनंतर तरी कर्डीले यांना अंधारात ठेवून स्वकीयांनीच किंवा 'मित्र' आणि 'पक्षा'तील लोकांनी ऐनवेळी फसवले असल्याचे बोलले जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत