राहुरी पोलिस ठाण्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या गणपत भाऊसाहेब तुपे (वय 75 वर्षे, वांबोरी) या आरोपीने चमचाने पोट फाडून कोठडीतच आत्महत्या क...
राहुरी पोलिस ठाण्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या गणपत भाऊसाहेब तुपे (वय 75 वर्षे, वांबोरी) या आरोपीने चमचाने पोट फाडून कोठडीतच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
गणपत भाऊराव तुप हा आरोपी राहुरी पोलिस ठाण्यातील कोठडी क्रमांक तीनमध्ये आहे. दि. 16 जून रोजी पहाटे चार वाजे दरम्यान सहाय्यक फौजदार सुरेश बनसोडे, महिला पोलिस शिपाई मंजूश्री गुंजाळ, पोलिस नाईक शिवाजी खरात, सोमनाथ जायभाये आदींची गार्डरुमला ड्युटी लावलेली होती. यावेळी आरोपी गणपत तुपे याने स्टीलच्या चमचाने स्वतःच्या पोटावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सदर घटना पोलिस कर्मचार्यांना समजताच त्यांनी गणपत तुपे याला कोठडीतून बाहेर काढले आणि घटनेची माहिती वरिष्ठ अधिकार्यांंना कळविली. वरीष्ठांच्या आदेशानुसार पोलिस कर्मचा-यांनी गणपत तुपे याला तातडीने राहुरी येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अहमदनगर येथील रूग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, तहसीलदार फसिओद्दीन शेख आणि पोलिस निरीक्षक मुकूंद देशमुख यांनी त्याची चौकशी केली असता, दोन महिन्यांपासून जामीन होत नाही. तसेच कोणीही नातेवाईक भेटायला आले नाही. त्यामुळे निराश होऊन मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती आरोपी गणपत तुपे याने दिल्याचे समजले.
घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर येथील अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. दिपाली काळे, डिवायएसपी राहुल मदने यांनी राहुरी पोलिस ठाण्याला भेट देऊन घटनेची माहिती घेतली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत