राहुरी फॅक्टरी : वेबटीम राहुरी तालुक्याची कामधेनू समजल्या जाणाऱ्या डॉ तनपुरे कारखान्याच्या या पंचवार्षिक मधील शेवटच्या गाळप हंगामासाठ...
राहुरी फॅक्टरी : वेबटीम राहुरी तालुक्याची कामधेनू समजल्या जाणाऱ्या डॉ तनपुरे कारखान्याच्या या पंचवार्षिक मधील शेवटच्या गाळप हंगामासाठी चेअरमन बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आपल्याला चेअरमन पदाची संधी मिळावी, यासाठी अनेकांनी देव पाण्यात बुडवून ठेवले असले तरी कारखान्याचे मार्गदर्शक आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ सुजय विखे पाटील हे कोणाला संधी देतात ? याकडे सभासदासह तालुक्याचे लक्ष लागून आहे
. राहुरी कारखाना हा तालुक्याची कामधेनू आहे, गेल्या चार वर्षांपूर्वी डॉ सुजय विखे पाटील यांनी हा कारखाना सुरू केला होता, तत्पूर्वी झालेल्या निवडणुकीत जनतेने विखे पाटलांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मोठ्या मताधिक्याने संचालक मंडळ निवडून दिले होते. त्यांनतर चेअरमन पदासाठी अनेकांनी लॉबिंग केले होते, मात्र विखे पाटील यांनी उदयसिंह सुभाष पाटील यांची चेअरमन पदी तर शामराव निमसे यांची व्हा चेअरमन पदी निवड केली होती. त्यांनतर मोठे नाराजी नाट्य झाले, काही 'जेष्ठ' यामुळे भलतेच दुखावले होते, असो, त्यांनतर चेअरमन व संचालक मंडळाने गेल्या चार वर्षात अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जात समाधानकारक गाळप केले, शेतकरी, कामगारांनाही काही पेमेंट दिले, सुसज्ज कारखाना केला, मशिनरी कामे केली, यासाठी जमिनी विकाव्या लागल्याचेही नाकारून चालणार नाही, त्यामुळे सभासद काही प्रमाणात नाराज आहेतच. यााशिवाय जिल्हा बँकेच्या कर्जामुळे यंदा कारखाना सुरू होतो की नाही अशी परिस्थिती होती, मा. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील व माजी आमदार शिवाजी कर्डीले यांच्या प्रयत्नांनंतर जिल्हा बँकेने कर्ज फेडीस मुदतवाढ दिली, त्यातून जप्तीची कारवाई टळून कारखाना सुरू करण्यास हिरवा कंदील मिळाला, त्यामुळे कारखान्याची यंत्रणा देखील कामाला लागली आहे. मात्र हे सुरू असताना या पंचवार्षिकचे हे शेवटचे गाळप आहे. पुढच्या वर्षी निवडणूक आहे, त्यामुळे किमान शेवटच्या वर्षी तरी आपले चेअरमन म्हणून नाव लागावे, यासाठी पुन्हा मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. काहींनी नात्यागोत्याचे राजकारण खेळले आहे, तर काहींनी माजी आमदार कर्डीलेकडून लॉबिंग केले आहे. दरम्यान, नुतन चेअरमन पदासाठी जेष्ठ संचालक सुरसिंगराव पवार, केशवराव कोळसे, मच्छिंद्र तांबे, उत्तमराव आढाव, शामराव निमसे, भारत तारडे, रवींद्र म्हसे, नामेदवराव ढोकणे, शिवाजी सयाजी गाडे, विजयराव डौले यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे जो तो प्रयत्नवादी आहे. काहींनी तर गुलाल आणून ठेवल्याची चर्चा आहे, असो, चेअरमन पदासाठी अनेक जण मायक्रो प्लॅन करून कामाला लागले आहेत, त्यामुळे ही निवड नाराजी नाट्यामुळे गाजणारी ठरण्याची शक्यता आहे. वास्तविकता, आशा प्रकारच्या या हालचाली दिसत असल्या तरी अद्याप विखे पाटील यांनी तसे कोणतेच बदलाचे संकेत दिल्याचे कानावर आलेले नाही, कदाचित हा बदल ठरलाच तर आपले नातेवाईक नामदेवराव ढोकणे यांनाच विखे पाटील या मोठ्या पदावर संधी देतील, अशी तालुक्यात चर्चा आहे , ही उंबरे गावाला संधी असल्याने गावात देखील मोठी आतुरता आहे, या आंनद घडीची गाव वाट पाहत आहे, तर काही संचालकांच्या मते विखे पाटील हे दूरदृष्टी नेतृत्व आहे, त्यात पुढील वर्षी निवडणुका आहेत, त्याचा विचार करतानाच राजकारणात नात्यापेक्षा एकनिष्ठता आणि काम करण्याची तत्परता असलेल्या सामान्य व्यक्तीला ते संधी देतील आणि वेळ पडलीच तर आहे त्या कारभाऱ्यांकडूनच हे शेवटचे गाळप काढून घेतील, असेही एकाने माहिती देताना सांगितले, त्यामुळे नेमके विखे पाटील काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, कारखाना चालू करण्यात माजी आमदार शिवाजी कर्डीले यांचे मोठे योगदान आहे, हे एकदा नव्हे अनेकदा विखे पाटील पिता पुत्राने कबूल केले आहे.त्यात कर्डीले यांना मानणारे ही संचालक कारखान्यात आहेत, कदाचित, जिल्हा बँकेतून मदत केल्याच्या बदल्यात ते एखादं नाव सुचवू शकतात? मात्र त्यांनी सुचविलेल्या नावाला विखे पाटील किती किंमत देतात ? ते निवडीनंतरच समजणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत