अहमदनगर(वेबटीम) जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र रविवारी पण सुरू ठेवावेत यासाठी देवळाली प्रवरा येथील आप्पासाहेब ढुस यांनी राज्याचे मुख्यमंत्री...
अहमदनगर(वेबटीम)
जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र रविवारी पण सुरू ठेवावेत यासाठी देवळाली प्रवरा येथील आप्पासाहेब ढुस यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विनंती केली आहे व त्याची प्रत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अहमदनगर यांना दिली आहे.
आप्पासाहेब ढुस यांनी पाठविलेल्या पत्रात म्हंटले आहे की, अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील बहुतेक कृषिसेवा केंद्र चालक रविवारी कृषी सेवा केंद्र बंद ठेवत असल्याने शेतकऱ्यांना खते, बी बियाणे व कीटकनाशके आदी वेळेवर मिळत नाहीत, त्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत असलेने राज्याच्या शेती उत्पन्नावर त्याचा परिणाम होत आहे.
जिल्ह्यातील काही कृषीसेवा केंद्रे ज्या पद्धतीने रविवारी सुट्टी घेत आहेत त्या पद्धतीने शेतीला आणि शेतकऱ्यांना सुट्टी घेता येत नाही. शेती व्यवसाय हा सुट्टीवर आधारित होऊच शकत नाही, त्यामुळे सर्व कृषी सेवा केंद्रांना अत्यावश्यक सेवेत सामावून घेऊन ते पूर्ण वेळ सुरू ठेवण्याची आवश्यकता आहे.
काही नोकरदार शेतकरी बांधवांना रविवारी सुट्टी असल्याने त्यांना याच दिवशी घरी राहून घरच्यांना संपुर्ण आठवड्याचे शेती नियोजन करून द्यावे लागते. पण बहुतेक दुकाने रविवारी बंद ठेवली जात असल्याने कृषी सेवा केंद्र चालकांच्या या मनमानी कारभाराचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे रविवारी सुद्धा सर्व कृषी सेवा केंद्र सुरू ठेवण्यासाठी संबंधितांना योग्य ते आदेश करावेत अशी विनंती आप्पासाहेब ढुस यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत