अहमदनगर( वेबटीम) राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे रविवार २२ नोव्हेंबर रोजी दुपारी भाजपचे नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नि...
अहमदनगर( वेबटीम)
राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे रविवार २२ नोव्हेंबर रोजी दुपारी भाजपचे नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी येणार असल्याने राजकिय वर्तुळात खळबळ उडाली असून वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
राधाकृष्ण विखे पाटील व अब्दुल सत्तार हे काँग्रेसमध्ये असताना त्यांची मैत्री सर्वदूर परिचीत होती. दरम्यान राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेसला रामराम करून भाजपात प्रवेश केला.
लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमधून उमेवारी न मिळाल्याने माजी मंत्री अब्दुल सत्तार नाराज होते. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची त्यावेळी भेट घेतली होती. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. औरंगाबादमध्ये काँग्रेसची उमेदवारी सुभाष झांबड यांना जाहीर झाल्यानंतर सत्तार यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत बंडाचे निशाण फडकवले होते. त्यानंतर काँग्रेसमधून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. अब्दुल सत्तार भाजपमध्ये जातील अशी चर्चा होती.मात्र सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला.त्यांना महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये महसुल राज्यमंत्री म्हणून जबाबदारी दिली.
दरम्यान मंत्री सत्तार हे रविवारी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून सकाळी ११.३० वाजता ते भाजप नेते तथा माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहे.या ठिकाणी ते १ तास थांबणार असून त्यानंतर पुढील कार्यक्रमास रवाना होणार आहेत.
मंत्री सत्तार हे विखेंच्या घरी येणार असल्याने राजकिय वर्तुळात खळबळ उडाली असून दोघांमध्ये काय राजकीय चर्चा होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत