अकोले(वेबटीम) केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ आज अकोले शहरात सर्व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळला.मात्...
अकोले(वेबटीम)
केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ आज अकोले शहरात सर्व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळला.मात्र ग्रामीण भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला राजूर येथे दहा नंतर व्यवहार सुरू झाले .
केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे पारित केले आहे.या कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे शेतकऱ्यांनी मोठे जनआंदोलन पुकारले असून या आंदोलनाला पाठिंबा म्हणून अकोले तालुक्यातील सर्व पक्षीय( भाजप वगळून) कार्यकर्त्यांनी अकोले बंदचे आवाहन केले होते.या आवाहनाला प्रतिसाद म्हणून अकोले शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून शेतकऱ्यांच्या लढ्याला आपला पाठींबा दर्शविला.आज सकाळपासून एका ही व्यापाऱ्याने आपले दुकान उघडले नाही.तसेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बसस्थानक परिसरात एकत्र जमून शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध केला.
हा बंद यशस्वी करण्यासाठी जेष्ठ शेतकरी नेते दशरथराव सावंत, डॉ.अजित नवले,कॉम्रेड कारभारी उगले,मिनानाथ पांडे,भानुदास तिकांडे,राजेंद्र कुमकर,विकास बंगाळ,दिली प शेणकर,खंडू बाबा वाकचौरे,बाळासाहेब नाईकवाडी,विनय सावंत,डॉ.संदीप कडलग,विलास आरोटे,दत्ता नवले,शांताराम संगारे,दादा पाटील वाकचौरे, अमोल नाईकवाडी,आरिफ तांबोळी,नितीन नाईकवाडी,गणेश कानवडे,संपत कानवडे,शिवाजी नेहे,ऍड के बी हांडे,ऍड भाऊसाहेब नवले, आदींनी परिश्रम घेतले तसेच नायब तहसीलदार महाले यांना निवेदन दिले.अकोले तालुक्यातील राजूर,कोतूळ, कळस बुद्रुक,कळस खुर्द व तालुक्यातील गावांमध्ये नागरिकांनी बंद पाळला. मात्र दुपार नंतर ग्रामीण भागात व्यवहार सुरळीत चालू झाले. तसेच वैद्यकीय सेवा,शैक्षणिक संस्था,बँका व शासकीय कार्यालये सुरळीतपणे चालू होती. मात्र प्रवाशांअभावी एस टी वाहतुक बंद ठेवण्यात आली होती.अकोले तहसीलदार ,पोलिस यांनी चोख बंदोबस्त ठेवला .
भाजपच्या वतीने माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केंद्र सरकारने पारित केलेले कृषीविषयक कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे असून विरोधक हा बंद राजकीय हेतूने करीत असून कोणीही या बंद मध्ये सहभागी होऊ नये असे आवाहन केले.तर भाजप कार्यकर्ते हे कृषीविषयक कायदे कसे फायद्याचे आहेत याचे मेसेज सोशल मीडियावर फिरवताना दिसत होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत