देवळाली प्रवरा(वेबटीम) केंद्र शासनाने केलेले शेतकरीविरोधी कायदे त्वरित रद्द करावी या मागणीसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा म्...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
केंद्र शासनाने केलेले शेतकरीविरोधी कायदे त्वरित रद्द करावी या मागणीसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा म्हणून पुकारण्यात आलेल्या भारत बंदला तालुक्यातील देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीमध्ये शंभर टक्के प्रतिसाद लाभला. देवळाली प्रवरा परिसरासह आसपासच्या गावातील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेऊन या भारत बंदला पाठिंबा दर्शवला देवळाली प्रवरा येथे बाजार तळ परिसरामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सभा घेऊन केंद्र शासनाचा निषेध करत सदर कायदे त्वरित रद्द करण्यात यावेत अशी मागणी करत शेतकरी आंदोलनास पाठिंबा दर्शवला.
दिल्ली येथे गेल्या आठ दिवसापासून केंद्र शासनाने केलेले शेतकरी विरोधी कायदे त्वरित रद्द करावे यासाठी शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास पाठिंबा म्हणून मंगळवार दिनांक ८ रोजी भारत बंदची पुकार देण्यात आली होता. याला प्रतिसाद म्हणून देवळाली प्रवरा व परिसरातील गावातील व्यापारी व नागरिकांनी आपले व्यवहार बंद ठेवत या भारत बंदला शंभर टक्के प्रतिसाद दिला. देवळाली प्रवरा येथे काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण ,राष्ट्रवादीचे प्रदेश सदस्य अजित कदम, काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष बाळासाहेब खांदे ,शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख बाबासाहेब मुसमाडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष केदारनाथ चव्हाण, नानासाहेब कदम, विश्वास पाटील कृष्णा मुसमाडे ,भागवत वाळुंज, बाबासाहेब संसारे प्राध्यापक सतीश राऊत, जगन्नाथ येवले आदींसह शेतकऱ्यांनी व विविध पक्षातील नेत्यांनी देवळाली प्रवरा येथील बाजारतळ येथे सकाळी एकत्र जमून या कायद्यांना विरोध करत केंद्र शासनाने केलेले हे काळे कायदे त्वरित रद्द करावेत अशी मागणी केली.
प्रथम बाजारतळ येथे असलेल्या शेतकरी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना आदींसह विविध पक्षाच्या नेत्यांनी आपल्या भाषणामध्ये हे कायदे त्वरित रद्द करण्याची मागणी करत शेतकरी आंदोलनास पाठिंबा दर्शविला .
यावेळी बोलताना बाळासाहेब चव्हाण यांनी सांगितले की, खोटारडेपणा हा भाजपाचा मुख्य मंत्र आहे निवडणूक जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या अनेक योजना आखणी या संदर्भामध्ये सूतोवाच केले गेले होते. मात्र प्रत्यक्षात हे केंद्र शासन शेतकरीविरोधी आहे. त्यामुळेच हे काळे कायदे केले गेले असून मोदी सरकारने शेतकरी आंदोलन बदनाम करण्याचा देखील प्रयत्न केला. हे आंदोलन चिरडण्याचा देखील प्रयत्न केला आहे .मात्र शेतकरी लढवय्ये आहेत करी हा देशाचा अन्नदाता आहे. त्यांना बदनाम करणाऱ्यांचा आम्ही निषेध करत आहोत देशाची स्वातंत्र्यानंतर प्रगती काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झाली .स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांचा मोठा सहभाग आहे. मोदींचे केंद्रसरकार राष्ट्र कृत बँक यांचे खाजगीकरण करत असून सरकारी व्यवस्थांचे खाजगीकरण करून ते धनदांडग्यांच्या ताब्यामध्ये देण्याचा त्यांचा डाव आहे. देशातील ८० टक्के शेतकरी काळ्या कायद्यामुळे बेरोजगार होणार आहेत. मोदी सरकार उद्योगपती व भांडवलदारांचे सरकार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अपंग बनवण्याचे एक षड्यंत्र सुरू आहे. मात्र महा विकास आघाडी शेतकऱ्यांच्या बरोबर असून हिटलरशाही निर्माण करण्याचा हा मोदी सरकारचा प्रयत्न शेतकरी नक्कीच हाणून पाडणार आहेत. मोदी सरकारला शेतकऱ्यांचा पुढे हात टेकावे लागणार असून त्यांना माघार घ्यावीच लागणार आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव नाही त्यामुळे तरुण शेतकरी आता पेटून उठला आहे. अन्यायाच्या विरोधात तरुण शेतकरी आता लढत आहे. त्यामुळे मोदी सरकारला हे तरुण शेतकरी त्यांची जागा नक्कीच दाखवून देतील.
यावेळी बोलताना अजित कदम यांनी सांगितले की, सत्तेच्या जीवावर काळे कायदे करणाऱ्या मोदी सरकारचा आम्ही निषेध करत आहोत. गेले आठवडाभरापासून शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरू असूनही या केंद्र शासनाला जाग येत नाही. उद्योजकांना मोठे करण्याचे एक षड्यंत्र असल्याने शेतकऱ्यांवर या कायद्यामुळे नक्कीच अनिष्ट येणार हे लक्षात आल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन उभे केले आहे. या कायद्यामुळे खंडाच्या कायद्याची पुनरावृत्ती होणार आहे मात्र आता शेतकऱ्यांच्या बाजूने देश उभा राहिल्याने मोदी सरकारला हे कायदे रद्द करणे भाग पडणार आहे.
यावेळी नानासाहेब कदम , प्राध्यापक सतीश राऊत यांचे भाषण झाले.यावेळी पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या आधिपत्याखाली मोठा पोलिस बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला होता.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत