राहुरी : वेबटीम राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांचे भरदिवसा अपहरण व निर्घृण हत्याप्रकरणी पोलिसांनी का...
- राहुरी : वेबटीम
राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांचे भरदिवसा अपहरण व निर्घृण हत्याप्रकरणी पोलिसांनी काल यातील मुख्य आरोपी समजला जाणारा कान्हू मोरे यास अटक केल्याने या गुन्ह्याची आता काही तासात उकल होणार आहे. दरम्यान, दातीर यांची हत्या 18 एकर भूखंड, गणेगावचा व्यवहार की अन्य कारणातून झाली, यात कान्हू मोरे हा 'मोहरा' आहे की मुख्य आरोपी, यात अजून कुणी सहभागी आहे का, यात चर्चेत असलेल्या 'त्या' दोन युवा नेत्यांचा खरचं काही संबंध आहे का ? ,या सर्व प्रश्नांची उत्तरे लवकरच पुढे येणार आहेत. - पत्रकार दातीर यांची हत्या झाल्यानंतर ही हत्या स्टेशन रोडलगतच्या 18 एकर भूखंड प्रकरणातून झाली असावी, असा सुतावरून स्वर्ग गाठत माजी आ शिवाजी कर्डीले यांनी या प्रकरणात मंत्री प्राजक्त तनपुरेंवर निशाणा साधला. 18 एकर भूखंडात मंत्री तनपुरे यांच्या मुलाच्या नावे असलेली सोहम प्रॉपर्टी, तनपुरेंचे मेव्हूने सुशील देशमुख यांचे इतर हक्कातील नावे आणि पत्रकार दातीर यांनी या भूखंडाच्या वादाचे घेतलेले मुखत्यारपत्र असा धागा पकडून भाजपने येथे तनपुरेंविरोधात जणू मोहीम उघडल्याचे पहायला मिळाले. माजी मंत्री कर्डीले, प्रा राम शिंदे यांनी वेळोवेळी जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन पारदर्शी चौकशीची मागणी केली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना देखील राहुरीत आमंत्रित केले, त्यामुळे हे प्रकरण चांगलेच चिघळून राज्याचे लक्ष वेधणारे ठरले. दरम्यान, पोलीस उपाधीक्षक मिटके यांनी या प्रकरणी काल तिसरा आनि मुख्य समजला जाणारा आरोपी अटक करताना यातील कान्हू मोरे याच्या नेवाशातून मुसक्या आवळल्या. मोरे यास अटक केल्यानंतर आता या प्रकरणाचा खऱ्याअर्थाने उलगडा होणार आहे. पत्रकार दातीर यांची हत्या का झाली, ती कशा पद्धतीने केली, यात किती आरोपी सहभागी होते, दातीर यांचा अडथळा 18 एकर भूखंड की गणेगाव जमीन व्यवहार प्रकरण यात सुरू होता, या दोन्ही व्यवहारात तालुक्यातील दोन युवा नेत्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आला आहे का, की अन्य काही कारणातून दातीर यांची हत्या झाली. कान्हू मोरे मुख्य आरोपी आहे की यांच्यामागे अन्य कुणी आहे ? याबाबतचे सर्व रहस्य आता उलगडणार असून, लवकरच पत्रकार परिषद घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक याबाबत माहिती देणार असल्याचे समजते. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीत राजकीय हस्तक्षेप होऊ नये, यासाठी भाजप लक्ष ठेऊन आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत