कोपरगाव/प्रतिनिधी कोविडच्या भयावह संकटातही कोपरगाव शहरात चोरीचे सत्र चालू होते. शहरातील विविध ठिकाणांहून तेराशे किलो वजनाचे बांधकामाचे लोखंड...
कोपरगाव/प्रतिनिधी
कोविडच्या भयावह संकटातही कोपरगाव शहरात चोरीचे सत्र चालू होते. शहरातील विविध ठिकाणांहून तेराशे किलो वजनाचे बांधकामाचे लोखंड चोरल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. याचा पोलिसांनी कसून तपास करत शनिवारी (ता.२२) सात आरोपींना सुमारे ३ लाख ५० हजाराच्या मुद्देमालासह गजाआड केले आहे. शहर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे पोलीस वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांतून कौतुक होत आहे.
सध्या कोविड संकटाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत आहे. याचाच फायदा उठवत चोरट्यांनी कोपरगाव शहरातील साईसिटी येथील बांधकामावरील पंधराशे किलो वजनाचे लोखंड १८ मे रोजी चोरून नेले होते. या प्रकरणी राजेश शांतीलाल कोकणी (रा.साईसिटी) यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं. १४६/२०२१ भादंवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच गवारे नगर येथील कचरु भास्कर निकम (रा.महादेव नगर) यांचे ११ मे रोजी रात्रीच्या वेळी अंदाजे १७० किलो वजनाचे लोखंड चोरीला गेले. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरनं.१५४/२०२१ भादंवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
यानंतरही हे सत्र सुरूच राहून जोशी नगर येथून १६ मे रोजी रात्रीच्या वेळी अंदाजे ३५० किलो वजनाचे लोखंड चोरीला गेल्याप्रकरणी नीरज मदनलाल कासलीवाल (रा.सरकार वाडा, सराफ बाजार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं. १५५/२०२१ भादंवि. कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या तिन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. आर.पी. पुंड, पो.कॉ. एस.जे.अग्रवाल हे करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार उपनगरातील खडकी येथील गट्या उर्फ विशाल राजेंद्र शिंदे (वय १८) यास ताब्यात घेउन विचारपूस केली असता त्याने चोरी करणाऱ्या टोळीतील इतर साथीदार दीपक अर्जुन दवंगे (वय १९), मुकेश मुनीर शेख (वय २१), सोमनाथ भाऊलाल सुराशे (वय १९), मुकुंदा ज्ञानेश्वर पवार (वय २४), पवन रमेश भालेराव (वय १८), आकाश अंकुश खरात (वय २१, रा.खडकी) यांच्या मदतीने तिन्ही ठिकाणचे लोखंड रात्रीच्या वेळी चोरुन ते साईसिटी येथील काटवनात नेऊन ठेवले असल्याची कबुली दिली. पोलिसांनी तत्काळ त्यांना सदर ते ठिकाण गाठून लपवून ठेवलेले १ लाख २५ हजार रुपये किंमतीचे १३०० किलो वजनाचे लोखंड जप्त केले. तसेच गुन्हा करताना वापरलेली २५ हजार रुपयांची दुचाकी (क्र.एमएच.१७, सीएफ. ०५६४) व पिवळे रंगाची २ लाख रुपयांची तीनचाकी ऍपे (क्र.एमएच.१७, एजी.९११९) असा एकूण ३ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.आर.पी. पुंड हे करीत आहेत. दरम्यान, शहर पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईचे पोलीस वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांतून कौतुक होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत