मुंबई : वेबटीम पंढरपूर निवडणुकीच्या निकालानंतर आता महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लीगल सेलचे...
मुंबई : वेबटीम
पंढरपूर निवडणुकीच्या निकालानंतर आता महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लीगल सेलचे नितीन माने यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून पंढरपुरात फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. निवडणुकीपूर्वी समाधान आवताडे यांच्या कारखान्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि सभासदांना निवडणुकीपूर्वी तीन दिवस डांबून ठेवलं आणि भाजपला मतदान करा, नाहीतर कामावरून काढून टाकू, असं सांगण्यात आलं. असा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला.पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा दुहेरी सामना रंगल्याचं चित्र पाहायला मिळालं. एकूणच ही लढत प्रतिष्ठेची लढत म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभरात ओळखली गेली. भाजपचे समाधान आवताडे हे या निवडणुकीत विजयी घोषित झाले. तर राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा त्यांनी 3 हजार 733 मतांनी पराभव केला.
दरम्यान, साम-दाम-दंड-भेद वापरून ही निवडणूक पार पडली असून त्याची योग्य ती चौकशी करून फेरनिवडणूक पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे. त्याबरोबरच प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे यांचे फोन रेकॉर्डिंग तपासावे आणि माजी न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून या निवडणुकीची चौकशी करावी, असं देखील या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या अध्यक्षतेखाली फेरनिवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लिगल सेलकडून करण्यात आली आहे. तसेच याबाबत त्यांनी मुख्य निवडणूक आयोग, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मुख्य सचिव आणि सोलापूरच्या जिल्हाधिकार्यांना देखील पत्र पाठवलं आहे. पण या सर्व प्रकरणात आता फेरनिवडणूक शक्य आहे का? आणि निवडणूक आयोग नेमकं या मागणीकडे लक्ष देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत