शेतकऱ्याचं रक्त शोषण ; खतदरवाढीतून पुन्हा कुपोषण ..! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शेतकऱ्याचं रक्त शोषण ; खतदरवाढीतून पुन्हा कुपोषण ..!

अहमदनगर :  सचिन शेजुळ  गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक संकट आणि सरकारचं सुलतानी धोरणं यामुळे शेती आणि शेतकरी संकटात सापडला आहे. त्यात...

अहमदनगर :  सचिन शेजुळ 


गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक संकट आणि सरकारचं सुलतानी धोरणं यामुळे शेती आणि शेतकरी संकटात सापडला आहे. त्यात महागडी बियाणे, खते, औषधें  आणि पिकांचे अहोरात्र संगोपन करूनही योग्य बाजारपेठ आणि हमीभाव मिळत नसल्याने शेतीचा खर्च आणि उत्पन्न याचे कोणतेही गणित जुळत नाही. त्यात, कोरोनाने शेतकऱ्यांना अक्षरशः रडवले आहे. गेल्या खरिपातही  काळ्यामातीत खेळलेला 1 हजार कोटींचा जुगार हा बळीराजा हरला आहे. अतिवृष्टी, वादळ यातूनही हाती आलेल्या शेतमालाला कोरोनाचं ग्रहण लागलं आणि योग्य व वेळेवर बाजारपेठ न मिळाल्याने खर्चही निघाला नाही. या चार महिन्यात 20 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने ही भीषण परिस्थिती दिसून येते. शेतकऱ्यांना आता दिलासा देण्याची गरज असताना  मोदी सरकारने खतांच्या किंमतीतही सरासरी 800 रुपयांनी वाढ करून  मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे खरोखरचं पेट्रोल पंप, कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर स्वतःचा फोटो मिरवणाऱ्या मोदींनी शेतकऱ्यांच्या वाढणाऱ्या मृत्यूचीही जबाबदारी स्वीकारून आता स्मशानभूमीवरही स्वतःचा एक फोटो वापरावा, अशीच राज्यात वेळ आली आहे.



       भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्यामुळे शेती हा आजही एक प्रमुख व्यवसाय आहे. भारतीय लोकसंख्येतील ६४ टक्के जनता कृषिक्षेत्रावर अवलंबून आहे आणि त्यांतील ७० टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यामुळे शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्था व समाजव्यवस्थेतील एक मूलभूत घटक आहे, या घटकात शेतकरी हा सदैव काबाडकष्ट करतो मात्र त्याच्या समस्या कायम ठेवून त्यावर राजकीय पोळी भाजत असल्याने सरकार कोणतंही येवो, मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न कायम तेवत ठेवले जातात. शिवाय, त्याच रक्त शोषून  गब्बर होणारे देखील अनेक आहेत. शेती मशागत करण्यापासून त्याच शोषण सुरू होत. त्यानंतर बियाणे खरेदी, रासायनिक खत, औषध घेताना कृषी दुकांनचालक हात साफ करतात, पुढे काढणीला डिझेल भाव वाढून हारवेस्टर किंवा मळणी यंत्राचे भाव वाढतात.  उत्पादित माल बाजारात नेण्यासाठी वाहन चालकही वाढीव भाडे घेतो, माल बाजार समितीत गेल्यावर हमाल,मापडी, दलाल आणि व्यापाऱ्यांची साखळी देखील शेतकऱ्याचे रक्त शोषण करतात, अगदी या साखळीत बाजार समिती पदाधिकारी ते थेट राज्य-केंद्र सरकार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे बळीराजाचे एखाद्या गोचिडाप्रमाणे रक्त पितात. त्यानंतर कुठं शेतमालाचे थोडेफार पैसे आले तर सावकार आहेच दारात..! आणि दुर्दैवाने हीच आपल्याकडे आता सिस्टम बनली आहे.   

       गेल्या वर्षी खरीप हंगामासाठी नगर जिल्ह्यातील 1 लाख 70 हजार शेतकऱ्यांना सुमारे 1 हजार कोटींचे कर्ज वाटप जिल्हा बँकेने केले होते. मात्र, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शेतकरी व शेतीउद्योग मोठ्या अडचणीत सापडला गेला. खरिपात झालेला अतिपाऊस, मका, कपाशी यासारख्या पिकांवर आलेले रोग यामुळे घटलेले उत्पादन आणि पडलेल्या बाजारभावामुळे गेल्या खरिपात शेतकऱ्यांच्या हाताला  काहीही लागले नाही. त्यामुळे खरिपातुन शेतीचा खर्चही फिटला नसताना पुन्हा रब्बीचे नियोजन करावे लागले, त्यात मशागत, बियाणे, खते यासाठी पुन्हा पैसा कसा उभा करायचा हा प्रश्नच ? अगोदरच खरिपाच कर्ज डोक्यावर असताना पुन्हा बँक दारात उभी करत नाही, अशाही परिस्थितीत नव्या उमेदीने बळीराजाने पतसंस्था, सावकारी काढून रब्बीचं नियोजन केलं. मात्र,नशिबाने यंदाही त्याची चेष्टाच केली.  

       वास्तविकत, कपाशी, मका, सोयाबीन यासारखी पिके लवकर काढून शेतकऱ्यांनी रब्बीसाठी आपली राने लवकर मोकळी केली होती. त्यात, मुळा, भांडरदरात रब्बीला व उन्हाळी पिकांना जरा बरे पाणी होते.  त्यामुळे कमी कालावधीचे पीक घेऊन दोन पैसे हातात येतील, या एकाच आशेवर पदरमोड करून गहू, कांदे, टोमॅटो, टरबूज, काकडी, कोथिंबीर अशी अनेक पीके शेतकऱ्यांनी लावली होती. परंतु, लॉकडाऊनमुळे व कोरोना भीतीमुळे शेतात मजूर कामाला आले नाही. त्यामुळे टरबूज, खरबूज, आंबे, भाजीपाला इत्यादी माल काढता आला नाही . काढला तर तो विक्रीसाठी बाजारात नेण्यासाठी वाहन नाही आणि नेलेच बाजारात तर विकल्या जाईल, याची कोणतीही हमी नाही. यामुळे शेतकऱ्यांना हा माल आपल्या डोळ्यांदेखत शेतात तसाच सोडून द्यावा लागत आहे.  कांद्यासारखे पीक मोठा खर्च करून काढले आहे; पण बाजार समित्या बंद आहेत, अन्य बाजारात पाहिजे तसा भाव नाही, बाहेरील ग्राहक नाही ही मोठी परवड आहे. गहू विक्रीसाठी तयार आहे; पण त्यालाही भाव नाही,  तीच अडचण दुधाची आहे. दूध कोणीही घ्यायला आज तयार नाही. पशुखाद्याचे भाव वाढले मात्र दुधदर कमी कमी होत आहेत.  सरकारने दूध घेण्याची घोषणा केली असली तरी त्यांचा दूध घेण्याचा कोटा मर्यादित आहे. याउलट परिस्थिती किराणा मालाची आहे. जो माल शेतकऱ्यांकडून घेऊन व्यापारी व दलालांनी गोदामे भरून ठेवली आहेत, त्या मालाचे म्हणजे शेंगदाणे, खाद्यतेलाचे दर लॉकडाउनमध्ये वाढतच आहे. आशा दृष्टचक्रात शेतकरी अडकला असताना जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात 20 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, हा आकडा वाढता आहे. दरम्यान ,  गेल्यावेळी खरीप आणि रब्बी हे दोन्ही हंगाम कोरोना आणि अतिवृष्टी, निसर्ग वादळ आशा नैसर्गिक आपत्तीमुले हातातून गेल्यानन्तर आता पुन्हा खरिपाची तयारी करावी लागणार आहे, मात्र गेल्या वर्ष-दोन वर्षात शेतीच गणित कोलमडले असताना आता पुन्हा पैशे आणायचे कुठून, कोण देणार उसनवारी, कुणापुढं हात पसरायचे ?  असे अनेक प्रश्न त्याच्यासमोर आहेत, मात्र तरीही बळीराजा खचणारा नाही, तो आपल्या मुलांचे शिक्षण, मुलीचा विवाह, स्वतःच नवं घर, सावकाराकडे गहाण पडलेला सातबारा कोरा करण्याची वेडं स्वप्न घेऊन पुन्हा नव्या उमेदीने काळ्या मातीत उत्तरेलच, आता अशावेळी सरकारनं शेतकऱ्यांमागे उभे राहण्याची गरज असताना राज्य आणि केंद्रात मात्र टोलवाटोलवी सुरू असून यात सर्वसामान्य जनतेसह शेतकऱ्यांचा चेंडू झाला आहे.  दैनंदिन जीवनातील गरजू वस्तू महागत आहेत, त्यात गॅस,किराणा, भाजीपाला भाव गगनाला भिडले आहेत, पेट्रोल, डिझेल वाढले आहे, हे कमी की काय म्हणून आता केंद्राने खतांचे भाव वाढवून कळस केला आहे. यातून शेतकऱ्याला खतांचे वाढीव नियोजन अवघड होणार आहे, अगोदरच कोरोना, लॉकडाऊन, बाजार बंद, मागणी नाही, भाव नाही, त्यात बोगस बियाणे, खतांचा साठेबाजार, वर दुष्काळ, अतिवृष्टी, रोगराईसारखी संकटे यात खरंच शेतकऱ्याला महागडी खते वापरणे शक्य आहे का ?असा सवाल उपस्थित होत आहे, केंद्राने ही दरवाढ मागे घ्यावी, किंवा अगोदरच कोरोनाने मृत्युदर वाढत असताना त्यात वाढत्या महागाईमुले जनतेला जिंवतपाणी मारणाऱ्या मोदींचा फोटो आता पेट्रोल पंप, गॅस फलक, कोरोना सर्टिफिकेट बरोबरच स्मशानभूमीत देखील लावावे, अशी उपरोधक टिकटिपण्णी सुरू झाली आहे, लवकरच राज्यभर राष्ट्रवादी या विरोधात आंदोलन करणार असल्याचे राज्याचे मंत्री जयंत पाटील म्हणाले आहेत, तसेच कृषिमंत्री दादा भुसे यांनीही केंद्राकडे खतांची दरवाढ मागे घेण्याबाबत पत्र पाठवत असल्याचं म्हंटल आहे. तरी, सरकारने दोन वर्षांची परिस्थिती लक्षात घेऊन गेल्या दोन वर्षांची कर्जमाफी करावी, तसेच येणाऱ्या खरिपासाठी पुन्हा कर्ज व्यवस्था करावी,  बियाणे, खते रास्त दरात मिळावे, हमीभावाचा ठोस निर्णय घ्यावा इत्यादि मागण्या केल्या जात आहे.


खतांचे वाढलेले नवीन दर 

इफको 10:26:26 चा जुना दर हा 1175 रुपये इतका होता, तो आता 1775 रुपये इतका झाला आहे. इफको 10:32:16 चा जुना दर हा 1190 इतका होता आता तो 1800 रुपये इतका झाला आहे. इफको 20:20:00 चा जुना दर हा 975 रुपये इतका होता तो आता वाढून 1350 रुपये इतका झाला आहे. डीएपी खताचा जुना दर हा 1875 रुपये इतका होता, तो आता 1900 रुपये इतका झाला आहे. आयपीएल डीएपी खताची जुनी किंमत 1200 रुपये होती ती आता 1900 रुपये इतकी झाली आहे. आयपीएल 20:20:00 ची जुनी किंमत ही 975 रुपये इतकी होती, ती आता 1400 रुपये इतकी झाली आहे. पोटॅशच्या एका पोत्याची किंमत आधी 850 रुपये होती, ती आता 1000 रुपये करण्यात आली आहे.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत