अहमदनगर : प्रतिनिधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुळापूर , ता.राहुरी या शाळेचा इयत्ता पहिलीतील विद्यार्थी, विराज विवेकानंद खामकर याने र...
अहमदनगर : प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुळापूर , ता.राहुरी या शाळेचा इयत्ता पहिलीतील विद्यार्थी, विराज विवेकानंद खामकर याने राज्यस्तरीय वर्ड पावर चॅम्पियनशिप या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. यापूर्वी सुद्धा ' राज्यस्तरीय अंकनाद पाढे पाठांतर' स्पर्धेत विराज ने प्रथम क्रमांक मिळवला होता. विराजच्या रूपाने दोन वेळेला जि. प. प्राथ. तुळापुर शाळेला राज्यस्तरावर आपले नाव उंचावण्याची संधी मिळाली आहे.राज्यात अव्वल ठरलेल्या विराजची ही कामगिरी तुळापूर शाळा , राहुरी तालुका व अहमदनगर जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.
लीप फॉरवर्ड या संस्थेने प्रादेशिक भाषेतील, प्राथमिक शाळेतील मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांची, शिक्षकांची इंग्रजी सुधारण्यासाठीचे विविध उपक्रम सुरू केलेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांचे राज्यभरात व्हाट्सअप ग्रुप तयार केले आहेत.प्रत्येक तालुक्याचा एक ग्रुप, याप्रमाणे केलेल्या त्या ग्रुपवर मुलांना सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकता व शिकविता यावे यासाठी काही सोप्या युक्त्या, सरावासाठी पीडीएफ ,व्हिडिओज पोस्ट केले जातात. ठराविक कालावधीच्या अंतरावर ऑनलाईन टेस्ट घेण्यात येतात. लीप फॉरवर्ड आयोजित सर्व अँक्टिव्हिटीज मध्ये विराज ने हुरूपाने सहभाग घेतला. एवढंच नव्हे तर शंभर टक्के क्विज सोडवल्या. लीप फॉरवर्ड च्या इंग्रजी सुधारासाठीच्या विविध टेक्निकचा भरपूर सरावही केला.याचेच फलित म्हणून तो इयत्ता पहिली मधून राज्यात प्रथम आला आहे. लीप फॉरवर्ड या संस्थेने ही स्पर्धा ऑनलाइन आयोजित केली.पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या या स्पर्धेचे स्वरूप कसे असेल ?, नोंदणी कशी करावी ? याविषयी सविस्तर मार्गदर्शन व्हिडिओ स्वरूपात लीप फॉरवर्ड च्या प्रत्येक व्हाट्सअप ग्रुप वर, फेसबुक पेज वर तसेच त्यांच्या यूट्यूब चॅनल वर ही प्रसारित केले होते. रेजिस्ट्रेशन झाल्यानंतर क्विझ सोडविणे,त्यानंतर एलिमिनेशन राऊंड नंतर सेमी फायनल राऊंड आणि शेवटी राज्यस्तरीय फायनल राऊंड असे एकूण स्वरूप होते.
संपूर्ण राज्यभरातून इयत्ता पहिलीसाठीच्या सात विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातुन विराज निवडला गेला होता. विराज ने यांतील उर्वरित विद्यार्थ्यांपेक्षा सरस कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. वर्ड पावर चॅम्पियनशिप या स्पर्धेतील विजेत्यांची नावे युट्युब लाईव्ह च्या माध्यमातून दिनांक आठ मे रोजी जाहीर करण्यात आले आहेत. विराज ला वर्गशिक्षक श्री.विवेकानंद खामकर, मुख्याध्यापक श्री.जगन्नाथ भांगरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. वेगवेगळ्या राज्यस्तरीय स्पर्धेत दोन वेळा प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विराज खामकरचे सध्या राज्यभरातून कौतुक होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत