कोपरगाव/(वेबटीम) संपूर्ण देशभर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व सरकारे, सर्वसामान्य जनता प्रयत्न करत आहे. यासाठी शासनाने 'ट्रेसिंग,...
कोपरगाव/(वेबटीम)
संपूर्ण देशभर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व सरकारे, सर्वसामान्य जनता प्रयत्न करत आहे. यासाठी शासनाने 'ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रीटमेंट' या त्रिसूत्रीवर भर दिला असून, प्रशासकीय यंत्रणा जीव धोक्यात घालून दीड वर्षांपासून कोरोना योद्धे बनूनच काम करत आहेत. यामध्ये अनेकांचा बळीही गेलेला आहे. तरी देखील काहीजण जाणीवपूर्वक 'कोरोना टेस्टिंग व लसीकरण मोहीम' हाणून पाडण्याच्या प्रयत्नांत आहेत, असा संशय येत आहे. या पार्श्वभूमीवर कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे कैफियत मांडली आहे.
सदर निवेदनात वहाडणे यांनी म्हंटले आहे की, कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग व कोपरगाव नगरपरिषदही स्वखर्चातून प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांची तपासणी करत आहे. शिवाय मोफत टेस्टिंग असूनही नागरिक मनापासून प्रतिसाद देत नाहीत असाच अनुभव येत आहे. अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहेत. परंतु काही ठराविक लोक हेतूपुरस्सर टेस्टिंगसाठी यायला तयार नाहीत. इतरवेळी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी रांगा लावणारे, लाभ घेणारे टेस्टिंग व लसीकरण करून घ्यायची टाळाटाळ करत आहे. यासाठी शासनाने कठोर भूमिका घेऊन देशातल्या प्रत्येक नागरिकाला सक्तीच केली पाहिजे. टेस्टिंग व लसीकरण करणाऱ्यांनाच फक्त सर्व शासकीय योजनांचे लाभ दिले पाहिजेत. जे लोक शासकीय आदेश पाळणार नाहीत त्यांचे रेशन पिवळे रेशनकार्ड, गॅस सबसिडी, पंतप्रधान आवास योजना, सर्व शासकीय अनुदाने, वेतन, आर्थिक लाभ बंद करावे.
याउपरही मास्क वापरायचे नाही, कोरोना विरूद्धच्या मोहिमेला प्रतिसाद द्यायचा नाही अशा प्रवृत्तीच्या लोकांचे लाड बंद करा. देशातील एक मोठा वर्ग असे नियमबाह्य व धोकादायक वर्तन करत असेल तर कोरोनाचा प्रादुर्भाव कसा कमी होईल? असा सवालही उपस्थित केला आहे. तसेच राजकारण्यांनी सुद्धा आपापल्या कार्यकर्त्यांना टेस्टिंग व लसीकरण सक्तीचे केले पाहिजे. अन्यथा अजून लाखो बळी गेल्याशिवाय राहणार नाहीत, अशी भीती देखील नगराध्यक्ष वहाडणे यांनी व्यक्त केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत