मागचेचं खरे की आताचे बरे ..? राहुरीकरांच्या मनात काय ? - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मागचेचं खरे की आताचे बरे ..? राहुरीकरांच्या मनात काय ?

      राहुरीच्या राजकारणात कर्डीले आणि तनपुरे समर्थक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र, कर्डीलेंच्या काळातील विकास कामे आण...



     
राहुरीच्या राजकारणात कर्डीले आणि तनपुरे समर्थक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र, कर्डीलेंच्या काळातील विकास कामे आणि मंत्री प्राजक्त तनपुरेंच्या दीड वर्षातील कामे यांची तुलना केली तर  'मागचेचं खरे की आताचे बरे ?'  असा प्रश्न समोर येताना दिसत आहे

 कर्डीले हे 10 वर्ष राहुरीचे आमदार होते.     या काळात अनेक विकास कामे केली, मात्र रोजगाराच्या बाबतीत ते पूर्णपणे अपयशी ठरले. त्यांच्या काळातही तालुक्यात एखादे मोठे भरीव काम झाल्याचं जनतेच्याच नव्हे तर कार्यकर्त्याच्याही तोंडातून ऐकायला मिळत नाही. मात्र, सर्वसामान्यांची कामे करण्याची त्यांची स्टाईल कुतूहल वाटणारी होती. कुणी कामे घेऊन गेल्यास थेट तहसीलदार, पीआय किंवा अन्य अधिकारी असेल त्यांना फोन करून काम मार्गी लावण्याच्या सूचना करत, त्यामुळे बुऱ्हाणगर किंवा राहुरीतील संपर्क कार्यालयात आलेला माणूस नाराज होऊन कधी परतला नाही. अर्थात सर्व कामे झाले असतील असेही नाही, मात्र त्यांनी प्रयत्न केले, हे नक्की. पुढे, गावोगावच्या चार दोन लोकांनी कर्डीले यांच्यापर्यंत सर्वसामान्य माणस पोहचू दिले नाहीत, किंबहुना अंर्तगत राजकारणात कर्डीलेंनी या लोकांना ताकद दिली आणि तेथूनच नाराजी वाढून एक सुप्त लाट तयार होऊ लागली. विधानसभा निवडणुकीत ही लाट बाहेर आली आणि कर्डीले पराभूत झाले. आता कर्डीलेंनी खूप कामे केली होती, तरीही ते पराभूत का झाले? याची कारणीमीमांसा केली तर त्यात अन्य काही कारणाबरोबरच बगलबच्यानी वाढवलेली नाराजी हे एक मुख्य कारण समोर येईल. 
कर्डीले अंतर्गत राजकारण आणि तनपुरेना मिळालेल्या सहानुभूतीचा लाटेमुळे पराभूत झाले असले तरी आजही काही प्रमाणात जनतेच्या मनात ती सल आहेच. आता तनपुरे आमदार झाले, योगायोगाने मंत्री पदही मिळाले, त्यांनी विकास कामांचा झपाटा लावला, शेतकऱ्यांना डिप्या देऊन अगदी त्या डिप्याचे देखील उदघाटन केली. काही अन्य कामेही मार्गी लावली, मात्र या दीड वर्षात त्यांनाही काही भरीव काम करता आलेले नाही, अर्थात कोरोना हा त्याला कारण ठरत असले तरी त्या काळातही जनतेला त्यांची फार मदत झाली असेही नाही. कर्डीलेंप्रमाणे त्यांनीही ठराविक लोकांना जवळ केले आहे, त्यामुळे जवळचे हे लोकंच ' खरे लाभार्थी' ठरत आहेत.  रेमडीसीवर बाबत तर त्यांच्याही बगलबच्यानी कळस केल्याने त्यांच्याविषयी नाराजी वाढली आहे. तनपुरेंची जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जनता दरबार घेतला मात्र त्याला कर्डीलेच्या जनता दरबार इतकी शोभा कधी दिसली नाही. उलट अधिकारीही  जनता दरबारातील कामे करण्यासाठी फार उत्साही दिसले नाहीत, त्यामुळे नाराजी वाढली आहे. अगोदरच मंत्रिपद मिळाल्याने लोकांच्या अपेक्षा वाढल्या असताना ही नाराजी देखील वाढती आहे. अगदी तनपुरे यांनी फोन घेतला नाही तरी लोकं आता नाराज होऊ लागले आहेत. नगरपालिका ठेके हा कळीचा मुद्दा आहे,  असून त्याचे लाभार्थी देखील जवळचे लोकं असल्याचे आरोप होत आहेत. एकीकडे जास्तीत जास्त लोक नाराज होत असताना दुसरीकडे कामाच्या बाबतीतही जनता फारसी समाधानी आहे, असेही काही नाही. कुठही मोठं भरीव काम त्यांनी केलं नाही, राहुरीच्या चार दोन पोरांना त्यांनी कुठं नोकऱ्या लावल्याचे कानावर नाही, कुठं रोजगार निर्मिती केल्याचं ऐकिवात नाही, काही मोठा उद्योग (प्रसाद शुगर वगळता)  राहुरीत आणला हे देखील माहिती नाही. उलट कर्डीललेंच्या काळातील प्रलंबित एसटी डेपो, एमआयडीसी विस्तार, अनेक गावांची रस्ते, पाणी प्रश्न , शहरातील विविध प्रश्न तनपुरेनाही सोडवता आलेले नाहीत, अर्थात त्यांचा प्रयत्न चालू आहे, मात्र त्यात यश कधी येईल हे देखील सांगता येत नाही. एकूणच, कर्डीले 10 वर्ष आमदार होते तर तनपुरे दीड वर्ष आमदार मंत्री आहेत, या कामांची तुलना होऊ शकत नाही मात्र तालुक्याची अवस्था पाहता  मागचे आमदार खरे की आताचे बरे ! हे जनता बोलत नसली तरी मनोमन जाणून आहे हे नक्की.                                 
सध्याचे सरकार हे पाच वर्षे चालेल की नाही याची सध्याच्या राजकीय घडामोडीवरून शास्वती नाही. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण यामुळे राज्यात आंदोलन पेटले आहे, भाजप ते आणखी भडकवून राज्य सरकारची कोंडी करणार आहे. अशावेळी अस्थिर झालेले हे सरकार कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थात, हा वेगळा विषय आहे, मात्र भाजपने हात घातलेले प्रश्न राहुरीत कर्डीले जनतेच्या निदर्शनास आणून देताना मंत्री तनपुरेंवर निशाणा साधत आहेत, त्यामुळे ओबीसी, मराठा आरक्षण, दूध दर, सरकारचे घोटाळे इत्यादींचा अप्रत्यक्ष परिणाम राहुरीतही आगामी निवडणुकात पहायला मिळणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत