कोपरगाव/प्रतिनिधी येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांची वर्ग 'अ' पदी पदोन्नती झाल्याने त्यांची अमळनेर नगरपरिषद येथे बदल...
कोपरगाव/प्रतिनिधी
येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांची वर्ग 'अ' पदी पदोन्नती झाल्याने त्यांची अमळनेर नगरपरिषद येथे बदली झाली. तत्पूर्वी त्यांनी १४ जून, २०१८ रोजी कोपरगाव नगरपरिषद मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारला होता. लोकनियुक्त नगराध्यक्ष व सत्ताधारी नगरसेवक या सगळ्यांसोबत काम करणे तशी तारेवरची कसरतच होती. परंतु सरोदे यांनी सर्वच पदाधिकारी, सर्व पक्षाचे कार्यकर्ते, उपनगराध्यक्ष व नगराध्यक्ष या सर्वांसोबत मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करून, कोपरगाव शहर विकासाचा गाडा ३ वर्षे यशस्वीरित्या चालविला.
सर्व कोपरगावकरांची इच्छा होती की, किमान १ वर्षे तरी सरोदे मुख्याधिकारीपदी कोपरगाव नगरपरिषदेस असावेत. परंतु शासकीय नोकरी म्हटलं की पदोन्नती, बदली ओघाने आलीच. प्रशांत सरोदे यांच्या सारख्या उमद्या अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळून ते वर्ग अ मुख्याधिकारी झालेत; त्याबद्दल सर्वच पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांना आनंद झाला. मात्र त्यासोबत दुःख देखील झाले की, त्यांच्या सारखा कर्तव्यदक्ष, उत्साही, सर्वांना सांभाळून घेणारा मुख्याधिकारी पदोन्नती नंतर बदलीमुळे अमळनेर नगरपरिषदेला जाणार आहे.
प्रशांत सरोदे मुख्याधिकारी असताना त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या विविध अडचणी सोडवून त्यांना सातवा वेतन आयोग लागू केला. तसेच वारसाहक्काने, शासकीय नियमाप्रमाणे १८ कर्मचाऱ्यांना नगरपरिषद सेवेत सामावून घेतले. कर्मचाऱ्यांच्या हितासोबतच शहराच्या विकासामध्ये देखील त्यांनी समतोल राखण्याचा प्रयत्न केला. सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या वॉर्डामध्ये मागणीप्रमाणे व शासकीय नियमांना धरून शक्य असतील तेवढी विकास कामे पूर्ण केली. मग त्यात गटारी, पेव्हिंग ब्लॉक, रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण, विविध भागात लिकेज असलेली पाईपलाईन दुरुस्ती, शहर स्वच्छता, कचरा विलगीकरण, यासोबतच स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये कोपरगाव नगरपरिषद देशातील पश्चिम विभागातून १८वे मानांकन प्राप्त करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. आजच्या या निरोप सत्कार समारंभ प्रसंगी मुख्याधिकारी सरोदे यांच्या सोबत उत्कृष्ट असा कार्यकाळ गेल्याची खंत उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे, बांधकाम अभियंता दिगंबर वाघ, अग्निशमन अधिकारी संभाजी कार्ले, डॉ.गायत्री कांडेकर, गोदामाई प्रतिष्ठानचे आदिनाथ ढाकणे, तालुका विद्यार्थी सहाय्यक समितीचे अध्यक्ष हिरालाल महानुभव, गटनेते वीरेन बोरावके, योगेश बागुल, नगरसेवक संदीप वर्पे, अपक्ष नगरसेवक महमूद सय्यद, यांनी व्यक्त केली.
नगराध्यक्ष विजय वहाडणे म्हणाले, मुख्याधिकारी सरोदे यांनी सर्वांना समान न्याय देऊन कोपरगाव विकासासाठी बहुमोल असे योगदान दिले. असा अधिकारी आणखी एक वर्ष आमच्या कोपरगाव शहरास पाहिजे होता. तसेच प्रभारी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या निरोप सत्कार समारंभास उत्तर देताना सरोदे म्हणाले, कोपरगाव शहराचा विकास साधताना नगराध्यक्ष यांनी मला खूप सहकार्य केले. त्यांनी विकासकामांबाबत कधी पक्षभेद, व्यक्तीभेद नगरसेवकांच्या बाबत केला नाही. सर्व प्रभागांमध्ये सारखीच कामे करण्याचा प्रयत्न केला. त्या सर्वांना सर्व नगरसेवकांनी देखील तेवढीच साथ दिली. कोपरगावचा विकास करताना विविध शासकीय अधिकारी प्रांत गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसुंदर, वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे, डॉ.गायत्री कांडेकर असो वा इतर शासकीय विभाग या सर्व अधिकाऱ्यांशी समन्वय साधून विकास साधण्याचा प्रयत्न केला. याकामी मला नगरपरिषदेमधील माझे सर्व अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार या सर्वांनी साथ दिली. त्यामुळेच हे शक्य झालं. शेवटी आमदार आशुतोष काळे, लोकनियुक्त नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपस्थित सर्व गटनेते, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे, सुशांत घोडके, सर्व पक्षांचे कार्यकर्ते, शहरातील नागरिक, व्यापारी, पत्रकार, कार्यालयातील सर्व सहकारी यांचे आभार मानले.
या निरोप समारंभ प्रसंगी गटनेते योगेश बागुल, मंदार पहाडे, अनिल आव्हाड, अनिल काले, मनसेचे शहरप्रमुख गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख सनी वाघ यांसह मोठ्या संख्येने शहरातील नागरिक, व्यापारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यापवेळी मुख्याधिकारी सरोदे यांचा सपत्नीक, नगरपरिषद अधिकारी-कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी, नगरपरिषद शिक्षण मंडळ व एम. के. आढाव विद्यालय, सर्व पत्रकार, नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी, मनसे, शिवसेना, समता पतसंस्था बँक, आयडीएफसी बँक, इंजिनिअरिंग असोसिएशन, नगरपरिषद ठेकेदारी असोसिएशन, यासोबतच वैयक्तिक नागरिक यांनी सरोदे यांचा यथोचित सन्मान केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महारुद्र गालट यांनी केले. तर आभर तुषार नालकर यांनी मानले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत