राहूरी(श्रीकांत जाधव) महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या साई संस्थांनमध्ये विश्वस्त मंडळ निवडी संदर्भात हालचालीला वेग आला असून जिल्ह्यात...
राहूरी(श्रीकांत जाधव)
महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या साई संस्थांनमध्ये विश्वस्त मंडळ निवडी संदर्भात हालचालीला वेग आला असून जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे अनेक आमदार अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. दरम्यान, माजीमंत्री स्व.गोविंदराव आदिक यांचे सुपुत्र व राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस युवानेते अविनाश आदिक यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे शिर्डी संस्थांनच्या अध्यक्षपदासाठी अविनाश आदिक रेसमध्ये आले असून पवार- आदिक भेटीमुळे संस्थांनच्या अध्यक्षपदासाठी अविनाश आदिक यांची लॉटरी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे घडल्यास श्रीरामपूरला ही दुसरी संधी ठरणार आहे.
अतिशय महत्वाच आणि मानाचं पद म्हणून विश्वस्थ पदाची ख्याती आहे. त्यामुळे अनेकांनी मुंबईला आपआपल्या सोयीनुसार अनेक मंत्र्याकडे फिल्डिंग लावली आहे. परंतु मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार दोन आठवड्याची मुदत विश्वस्त मंडळ स्थापनेसाठी राज्यसरकारला दिली आहे, त्यानुसार विश्वस्थ मंडळातील प्रत्त्येक सदस्याचे चारित्र्य तसेच शैक्षणिक पात्रता, अनुभव इत्यादी बाबी तपासूनच अभ्यासपूर्वक निवडी केल्या जात आहे.
सध्या अध्यक्ष व उपाध्यक्ष या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय कॉग्रेसमध्ये रस्सीखेच सुरूच असून येत्या दोन दिवसात त्याचा तिढा सुटणार आहे. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून आ.आशुतोष काळे, आ.रोहित पवार, आ.निलेश लंके याशिवाय राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे निकटवर्तीय सुरेश वाबळे यांची नाव चर्चेत असताना माजीमंत्री स्व.गोविंदराव आदिक यांचे सुपुत्र राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व अविनाश आदिक यांनी मुंबई येथे शरदचंद्र पवार यांची भेट घेतली. विश्वस्त निवडीच्या लगबगीत त्यांनी पवार यांची भेट घेतल्याने या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. अतिशय संयमी, शांत तसेच अभ्यासू नेतृत्व म्हणून आदिक यांच्याकडे पाहिले जाते.त्यामुळे शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदासाठी ऐनवेळी अविनाश आदिक यांचे नाव पुढे येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
श्रीरामपूरचे माजी आमदार स्व.जयंतराव ससाणे यांनी शिर्डी संस्थांचे अध्यक्षपद भूषवून मोठ्या प्रमाणात विकासाचा डोंगर शिर्डी नगरीत उभारला होता. देशभर साईबाबांची ख्याती व महती पोहचविण्यात स्व.ससाणे व तत्कालीन विश्वस्त मंडळाचे मोठे योगदान आहे. अविनाश आदिक यांची शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी निवड करून पुन्हा एकदा श्रीरामपूरला संधी मिळते की काय अशी चर्चा पवार- आदिक यांच्या भेटीनंतर सुरू झाली आहे.
विधानपरिषदेच्या बदल्यात शिर्डी संस्थान..!
पवार आणि आदिक कुटुंबाचे जिव्हाळ्याचे नातेसंबंध राज्याला माहिती आहेत. शिवाय, विधांनपरिषदेतून अविनाश आदिक यांना आमदार करण्याचा स्वतः पवारांनी त्यांना शब्द दिलेला आहे. आता चार महिन्यांवर विधान परिषद लागणार आहे, मात्र जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीवेळी रुसून बसलेले चंद्रशेखर घुले यांना विधांनपरिषदेचा शब्द दिल्याचे समजले आहे, त्यामुळे आदिकांची अडचण वाढली होती. मात्र पवारांनी त्यांना दिलेला शब्द पाळण्यासाठी आता शिर्डी संस्थान मोठा पर्याय मिळाला आहे. शिवाय आदिक हे विश्वासु आणि कुटुंबातील सदस्य असल्याने त्यांना ही संधी मिळू शकते, हे नक्की.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत