कोपरगाव/प्रतिनिधी शहरातील अनेक ठिकाणी खोका शॉप/गाळे उभारण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून अनेकदा शासनाकडे प्रयत्न केले हे सर्वांना माहीत...
कोपरगाव/प्रतिनिधी
शहरातील अनेक ठिकाणी खोका शॉप/गाळे उभारण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून अनेकदा शासनाकडे प्रयत्न केले हे सर्वांना माहीत आहे. तरी देखील कुणी तरी जागा मिळवून देण्यासाठी व्हाट्सऍपवर संदेश पाठवून विस्थापितांना वेड्यात काढत असेल तर माझा नाईलाज आहे. विस्थापितांननी सावध रहावे, कारण निवडणूक जवळ आल्याने अनेक तथाकथित समाजसेवक सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करतील, असा टोला नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी विरोधकांना लगावला.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नगराध्यक्ष वहाडणे यांनी म्हंटले आहे की, कोपरगाव शहरातील विस्थापितांना न्याय मिळावा यासाठी येवला रोड, एस. जी. विद्यालय पश्चिमेकडील भिंतीलगत, धारणगाव रोड, चर्च जवळ, बाजारतळ, काँग्रेस कमिटी जवळ अशा अनेक जागांवर खोका शॉप/गाळे उभारण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून शासनाकडे अनेकदा प्रयत्न केले. परंतु शासन रस्त्यालगत परवानगीच द्यायला तयार नाही. म्हणून सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ घेऊन अहमदनगर येथील वरीष्ठ अधिकाऱ्यांना भेटलो. मात्र हिंमत असेल तर माजी आमदारांना विचारून बघा की, राज्यात व देशात तुमच्याच पक्षाची सत्ता असताना विस्थापितांना न्याय का मिळवून दिला नाही? संगमनेर, सिन्नर येथील बस स्थानकाजवळ अनेक गाळे बांधण्यात आले, तसे कोपरगाव बसस्थानकाजवळ का बांधले नाहीत? घाईघाईने श्रेय मिळविण्यासाठी भूमिपूजन का उरकले? मी तीनवेळा शहर विकासाचे प्रस्ताव माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले, त्यावेळी का अडथळे आणले? ११ वर्षांपूर्वी अतिक्रमण हटविले जात असताना व्यावसायिकांच्या बाजूने तुम्ही कुणीही का उभे राहिले नाही? विस्थापितांच्या जागा दुसऱ्यांनी बळकाविल्या, परस्पर भाड्याने दिल्या, हे आता पत्रकबाजी करणाऱ्यांना दिसत नाही का? अशा नानाविध प्रश्नांची विरोधकांवर सरबत्ती करून व्हाट्सऍपवर माझ्याविरुद्ध लिहून नेत्यांची शाबासकी मिळेल. पण येणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कुणीही विस्थापितांच्या भावनांशी खेळू नये. शासन जर परवानगीच देत नाही, तरीही आपण खोका शॉप उभे केले तर शासन पुन्हा अतिक्रमणे काढून टाकील हे हुशार व्यक्तींच्या लक्षात येत नाही का? असा उलट सवालही केला आहे.
ज्यावेळी भाजपचे सरकार व भाजपच्याच आमदार होत्या त्यावेळीच शासनाकडून परवानगी का मिळविली नाही? कारण नगराध्यक्ष वहाडणे यांच्या काळात खोका शॉप झाले तर श्रेयही वहाडणे यांनाच मिळेल याच कारणाने विस्थापितांकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचा आरोप केला. केवळ निवडणूक पार पडेपर्यंत
विस्थापितांना नादी लावणारे कोण व स्पष्टपणे वस्तुस्थिती सांगणारे व मनापासून प्रयत्न करणारे कोण आहेत हे जनतेला माहित आहे. बालाजी गोर्डे यांचे वडीलही माझे मित्रच आहे. त्यांनी दुकान विकत घेतले व त्याचवेळी अतिक्रमण हटाव मोहीम होऊन त्यांचे आर्थिक नुकसान झाले हे खरे आहे. त्यांचेकडून पैसे उकळणारे दिवंगत पालिका कर्मचारी कुणाच्या बैठकीतील साथीदार होते हे मी सांगायची गरज नाही. जागा मिळावी ही त्यांची अपेक्षा बरोबरच आहे. पण त्यांना व इतरही विस्थापितांना अधिकृतपणे जागा द्यायला शासनाची परवानगी मिळालेली नाही. केवळ बाजारतळ येथे काही खोका शॉप व काँग्रेस कमिटीजवळ खोका शॉप किंवा गाळे यासाठी परवानगी मिळण्याची शक्यता आहे, तसे प्रयत्न देखील सुरू असल्याचे नगराध्यक्ष वहाडणे यांनी शेवटी स्पष्ट केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत