कोपरगाव पालिकेच्या अंतर्गत असलेल्या 28 कामांबाबत जनतेत गैरसमज पसरवणारी खोटारडी पत्रकार परिषद कोल्हे गटाने घेतली आहे. परंतु, उच्च न्यायालयाने...
कोपरगाव पालिकेच्या अंतर्गत असलेल्या 28 कामांबाबत जनतेत गैरसमज पसरवणारी खोटारडी पत्रकार परिषद कोल्हे गटाने घेतली आहे. परंतु, उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती लवकरच उठेल. कारण न्यायालयासमोर दुसरी बाजू मांडलीच गेलेली नाही. तरी देखील कोल्हे गट विकासकामे होऊ नये म्हणून या थराला जाईल असे वाटले नव्हते. म्हणूनच आम्ही कॅव्हेट दाखल केली नसल्याचा खुलासा करत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
बुधवारी (ता.7) नगराध्यक्ष वहाडणे यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. जिल्हाधिकार्यांनी 23 मार्चला निर्णय दिल्यानंतर एका महिन्यात कमिशनर यांच्याकडे अपिल करता येते म्हणून एक महिन्यानंतर ठेकेदारांना अनामत रक्कम भरण्याचे पत्र देऊन प्रक्रिया पूर्ण केली. दोन महिन्यांत कार्यादेश दिले तरीही कार्यादेश द्यायला 4-5 महिने उशीर केल्याचा व मुख्याधिकार्यांनी जाताना घाईघाईत कार्यादेश दिल्याचा भंपक आरोप केला असल्याचे वहाडणे म्हणाले.
केवळ सहा-सात कामांवरच आक्षेप आहे म्हणणार्यांनी इतर 22 कामेही का नामंजूर केली? निवडणूक आचारसंहिता लागेपर्यंत विरोध करायचा व कामेच होऊ द्यायची नाहीत हाच कोल्हे गटाचा डाव असल्याचा आरोप करत सर्वसाधारण सभेत सर्व 28 कामे वाचून दाखवा असे म्हणत असताना बहुमताच्या जोरावर गोंधळ घालून हा विषयच नामंजूर करणारे आज खोटे बोलताहेत, त्यांनी सभेचे रेकॉर्डिंग बघावे असे आव्हान दिले आहे. याचबरोबर नगरसेवक अनिल आव्हाड यांनी मला राजकारणाशी घेणेदेणे नाही, माझ्या प्रभागातील काम करावेच लागेल असे आक्रमकपणे सांगितल्याने त्यांचे काम मंजूर झाले. इतर नगरसेवकांनी स्वतःच्या प्रभागातील कामे व्हावीत म्हणून दबावापोटी आग्रह धरला नसल्याचे स्पष्ट केले.
खरेतर काम पूर्ण झाल्यानंतरच मोजमाप करून बिला अदा केले जाते हे माहीत असूनही कोल्हे गट वेड्याचे सोंग घेत असल्याचा जोरदार आरोप करत पेव्हर बसविले नाहीत, दुभाजक लावले नाहीत तर त्याचे बिल होणारच नाही. मात्र, पुन्हा अंदाजपत्रक करा म्हणणे हा ठरवून केलेला मूर्खपणा असल्याची दर्पोक्ती जोडली. प्रभाग तीनमधील खडीकरण व पाचमधील गटार ही दोन्ही कामे स्थगित ठेवण्याचे 16 फेब्रुवारी, 2021 च्या सर्वसाधारण सभेत सांगितले होते, तसे रेकॉर्डिंगही आहे. मात्र, त्याबद्दल प्रभाग पाचचे मित्र आज खोटे बोलताहेत असा खुलासा त्यांनी केला. 84 लाखांच्या गटारीचे काम ज्ञानेश्वर गोसावी यांना मिळत नाही असे लक्षात आल्यावर हे काम करू नका असे ते म्हणाताहेत हे संबंधित नगरसेवकांनी शपथपूर्वक सांगावे. 4 वर्षे स्वतःच्या प्रभागातील कामे व्हावीत म्हणून सहकार्य करणारे-गोड बोलणारे विधानसभा पराभवानंतर मात्र शहरातील मोक्याचे रस्ते झाले तर वहाडणेंविरुद्ध बोलायचे काय? या भीतीने नेत्यांच्या आदेशानुसार विरोध करू लागले आहेत. विषय नामंजूर करा तुम्हांला निवडून आणायची जबाबदारी माझी असा उर्मट आदेश युवराजाने दिल्यानंतरच वातावरण बिघडले असल्याची टीका वहाडणे यांनी केली. युवराजाला सलाम करायला मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी जावे असे कोल्हे गटाने अनेकदा प्रयत्न केले होते. परंतु, ते बधले नाहीत, यामुळेच त्यांच्यावर आरोप होत असल्याचेही स्पष्ट करुन नवीन मुख्याधिकार्यांवर दबाव आण्याचाच हा प्रयत्न असल्याचे सांगितले.
स्वीमिंग टँकचे थडगे बांधणारे, स्वतःचे अतिक्रमण काढू नका यासाठी गयावया करणारे, वाटा मागण्यासाठी ठेकेदारांमागे फिरणारे, गो-हत्या करणार्यांना पाठिशी घालणारेच आज पत्रकार परिषदेत तोंड वर करून कसे बोलतात हेच आश्चर्य आहे. सध्या पाऊस चालू असताना डांबरीकरण करणे शक्य नाही. आता पत्रकार परिषद घेऊन टीका झाल्याने रस्त्यांची कामे करायला ठेकेदार धजणार नसल्याने जनतेलाच हाल सहन करावे लागणार, निवडणूक आचारसंहिता लागू होईपर्यंत कामेच होऊ द्यायची नाहीत हाच कोल्हे गटाचा कुटील डाव असल्याचा घणाघाती आरोपही वहाडणे यांनी केला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत