आंबी (वेबटीम) राहुरी तालुक्यातील आंबी सजेला पूर्णवेळ तलाठी देण्याची मागणी धनगर समाज संघर्ष समितीचे राहुरी तालुकाध्यक्ष जालिंदर रोडे यां...
आंबी (वेबटीम)
राहुरी तालुक्यातील आंबी सजेला पूर्णवेळ तलाठी देण्याची मागणी धनगर समाज संघर्ष समितीचे राहुरी तालुकाध्यक्ष जालिंदर रोडे यांनी केली आहे. त्यांनी या संबंधीचे निवेदन राहुरीचे उपविभागीय अधिकारी दयानंद जगताप, तहसीलदार एफ. एस. शेख यांना दिले आहे.
तलाठी रूपेश कारभारी यांची संवर्ग बदली झाल्यानंतर आंबी सजेला अद्यापही पूर्णवेळ तलाठी दिलेला नाही. त्यानंतर प्रभारी पदभार पिंपळगाव फूणगीचे तलाठी अशोक चितळकर यांना दिला. त्यांचीही श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे बदली झाली. सध्या आंबी सजेचा प्रभारी पदभार देवळाली प्रवराचे तलाठी दिपक साळवे यांच्याकडे दिला आहे. आंबी सजेअंतर्गत आंबी, अंमळनेर, केसापूर ही गावे येतात. या गावांचा विस्तार मोठा आहे. विविध प्रकारचे दाखले, सात बारा, आठ अ उतारे, उत्पन्नाचे दाखले, विविध विशेष सहाय्य योजनांसाठी लागणारे दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना चकरा माराव्या लागतात. सध्या मोबाईलद्वारे ई-पीक पहाणी कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे आंबी सजेसाठी लवकरात लवकर पूर्णवेळ तलाठी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी धनगर समाज संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष जालिंदर रोडे यांनी केली आहे.
"ग्रामस्थ व प्रशासन यांमधील मुख्य दुवा म्हणजे तलाठी असतो. पूर्णवेळ तलाठी नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रांताधिकारी साहेब, तहसीलदार साहेब यांनी लवकरात लवकर आंबी सजेसाठी पूर्णवेळ तलाठी नियुक्त करावा."
- सौ. संगीताताई बाळासाहेब साळुंके (सरपंच आंबी)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत