कोपरगाव/प्रतिनिधी:- शहरातील काही रस्त्यांची भयानक दुरावस्था झालेली आहे यात दुमत नाही. परंतु, रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिकांचे होणारे हा...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
शहरातील काही रस्त्यांची भयानक दुरावस्था झालेली आहे यात दुमत नाही. परंतु, रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिकांचे होणारे हाल व 28 विकासकामांना उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती हे विषय चर्चेचे होऊन सर्वत्र कोपरगाव शहराची बदनामी होत आहे. त्यासाठी स्थगिती उठविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नगराध्यक्ष वहाडणे यांनी म्हटले आहे की, राजकिय नेते, कार्यकर्ते यांना नागरिकांचे हाल होत असताना चालू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे सर्वच राजकारणीही बदनाम होत आहेत. हे सर्व थांबविण्यासाठी उच्च न्यायालयातून स्थगिती मिळविणासाठी आत्तापर्यंत झालेले आरोप-प्रत्यारोप, मान-अपमान, राजकीय हेवेदावे विसरून अर्ज देण्याबाबत पुढाकार घ्यावा. त्यानंतर आपण सर्व पक्षांचे गटनेते व दोन त्रयस्थ तज्ज्ञांची समिती नेमून सर्व कामे दर्जेदार करून घेऊ. अंदाजपत्रक कितीही रकमेचे असले तरी जेवढे काम होईल तितकेच मोजमाप करून ठेकेदारांची देयके अदा करू. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होतच असतात, तरी आपण कुणीही एकमेकांचे शत्रू नाही. निवडणूक येईल त्यावेळी प्रत्येकाला आपल्या पक्ष-गटाचे समर्थन करण्याचा अधिकार आहे. पण राजकीय हेवेदाव्यांचा अतिरेक होऊन आपण सर्वजण जनतेच्या मनातून कायमचे उतरायला नको, इतके तरी भान प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे. आज कुणावरही दोषारोप करणार नाही. कारण, शहरात विकासकामे व्हावीत हेच महत्वाचे आहे. स्थगिती उठवून कामे झाली नाही तर येणार्या नगरपरिषद निवडणुकीनंतरही असेच गढूळ वातावरण राहील. एकमेकांना अडथळे आणले गेले तर ते कोपरगाव शहराच्या विकासाच्यादृष्टीने योग्य होणार नाही, असेही नमूद केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत