शिर्डी/वेबटीम:- "प्रस्तावित 'मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन' च्या कामामुळे कोपरगांव परिसरातील एकाही शेतकऱ्यांची सामाजिक व पर्यावरणी...
शिर्डी/वेबटीम:-
नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, नवी दिल्ली व महाराष्ट्र शासनाच्या वतीने 'मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन' समृद्धी महामार्गाला समांतर उभारण्याचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले, निवासी जिल्हाधिकारी संदिप निचित, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली या रेल्वे प्रकल्पाच्या पर्यावरण व सामाजिक विचारांसाठी सार्वजनिक सल्ला बैठक कोपरगाव येथे तहसील कार्यालयात शुक्रवार , दिनांक १७ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री.चंद्रे बोलत होते. या बैठकीला कोपरगांव गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड,नवी दिल्ली (एनएचआरसीएल) चे पथक प्रमुख राहूल रंजन, सहाय्यक समाज विकास अधिकारी श्याम चौगुले, पर्यावरण मूल्यांकन अभ्यासक प्राजक्ता कुलकर्णी, प्रदीप बर्गे आदी अधिकारी उपस्थित होते.
श्री.योगेश चंद्रे म्हणाले, सदर प्रकल्पामध्ये पर्यावरण, जैव विविधता, ग्रामसभेच्या माध्यमातून स्थानिक लोकांच्या भावना व गरजांचा संवेदनशीलपणे विचार करण्यात आला आहे.
श्रीमती प्राजक्ता कुलकर्णी म्हणाल्या, बुलेट ट्रेन प्रोजेक्ट सुरू करण्यापूर्वी या परिसरातील हवा, ध्वनी, पाणी व जमीन या पर्यावरणीय व इतर सामाजिक घटकांचा सूक्ष्म अभ्यास करण्यात येईल. कुठेही झाडांची कत्तल होणार नाही. याची पुरेपूर दक्षता घेण्यात येईल.याप्रसंगी बुलेट ट्रेन संदर्भात चित्रफित व्दारे संभाव्य नियोजन संदर्भात माहिती देण्यात आली.या सभेला कोपरगाव तालुक्यातील धोत्रे, भोजडे, कान्हेगान, संवत्सर, कोकमठाण,जेऊर कुंभारी,डाऊच खुर्द, चांदे कसारे, पोहेगांव खुर्द,घारी, देडे कुऱ्हाळे या ११ गावांचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक श्री.सुशांत घोडके यांनी केले.
कसा आहे प्रस्तावित 'मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन' प्रोजेक्ट
केंद्राच्या नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनतर्फे देशातील मेट्रो शहरांना बुलेट ट्रेनने जोडण्यात येणाऱ्या प्रस्तावित ८ बुलेट ट्रेन कॉरिडॉर प्रकल्पात 'नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन'चा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, नाशिक, अहमदनगर ,औरंगाबाद ,जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती,वर्धा व नागपूर या ११ जिल्ह्यातून ही बुलेट ट्रेन धावणार आहे. समृद्धी महामार्गाला समांतर असा हा बुलेट ट्रेन मार्ग आहे. मुंबई-नागपूर दरम्यान ७३९ किलोमीटरचा हाईस्पीड कॅरिडॉर आहे. यामुळे मुंबई-नागपूर अंतर अवद्या साडेतीन तासात कापले जाणार आहे. यात ११ जिल्ह्यातील १२४५.६१ हेक्टर जमीन संपादीत केली जाणार आहे. यात कोपरगांव तालुक्यातील ११ गावांची ५१.५० हेक्टर जमीन संपादीत होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत