कोपरगाव/प्रतिनिधी:- कोपरगाव शहरातील आदिनाथ सोसायटीत रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. अनेकदा नगरपरिषदेस सामाजिक कार्यकर्ते निसार शेख ...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील आदिनाथ सोसायटीत रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. अनेकदा नगरपरिषदेस सामाजिक कार्यकर्ते निसार शेख यांनी विनंती करूनही दखल घेतली नव्हती. अखेर आज त्यांच्या पाठपुराव्यातून आणि याकूब शेख यांच्या प्रयत्नांतून रस्त्याचे काम मार्गी लागले आहे.
शहरातील आदिनाथ सोसायटी येथील रस्त्याची पावसाच्या पाण्यामुळे दयनीय अवस्था झाली होती. तसेच गटारीची देखील नितांत गरज होती. यासाठी २०१७-१८ पासून पाठपुरावा सुरू होता; तरीही मागण्या पूर्ण झालेल्या नव्हत्या. पावसाळ्यात पाणी साचून रस्ता चिखलमय झाला होता. यातून वाट शोधणे मुश्कील व्हायचे; म्हणून तात्पुरत्या स्वरूपात किमान मुरुम टाकून रस्ता दुरुस्ती करावी अशी मागणी समोर आली.
अखेर सामाजिक कार्यकर्ते निसार शेख आणि अर्शी कन्स्ट्रक्शनचे संचालक याकूब शेख यांच्या अथक प्रयत्नांतून व रहिवाशांच्या सहभागातून मातीविरहित जाड मुरुम टाकून रस्ता दुरुस्त करण्यात आला. यामुळे आदिनाथ सोसायटीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आणि सामाजिक कार्यकर्ते निसार शेख व याकूब शेख यांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत