कोपरगाव/प्रतिनिधी:- मुंबई व नागपूर या दोन महानगरांना जोडणार्या समृद्धी महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. परंतु, या कामासाठी वापरात ये...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
मुंबई व नागपूर या दोन महानगरांना जोडणार्या समृद्धी महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. परंतु, या कामासाठी वापरात येणार्या वाहनांनी कोपरगाव तालुक्यातील खोपडी-भऊर रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे तत्काळ हा रस्ता तयार करुन द्यावा. अन्यथा, समृद्धी महामार्गाचे एकही वाहन या रस्त्यावर चालू देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सतीश काकडे यांनी दिला आहे.सद्यस्थितीत तळेगाव रस्त्यालगत असलेल्या खोपडी (धोत्रे) - भऊर रस्त्यावरुन समृद्धी महामार्ग बनविण्यासाठी अहोरात्र असंख्य डंपर सुरू आहेत. या जड वाहतुकीमुळे धोत्रे-खोपडी गावच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रात्रीच्या वेळेस वाहन चालविणे सोडा पायी चालणे देखील मुश्किल झाले आहे. नागरिकांना कामानिमित्त बाहेर जाणे देखील अशक्य होत आहे. गावातील एखादा व्यक्ती आजारी पडल्यास त्याला लवकरात लवकर उपचारांसाठी दवाखान्यात दाखल करावयाचे असल्यास या रस्त्याने कसे घेऊन जायचे हा प्रश्न पडला आहे. या समस्येला केवळ समृद्धी महामार्गाच्या कामासाठी चालू असलेली डंपर वाहतूकच कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे वरील रस्त्यावर तत्काळ मुरुम टाकून रस्ता तयार करुन द्यावा.
अन्यथा, समृद्धीच्या कामासाठी जाणारी कोणत्याही प्रकारची वाहने या रस्त्यावरुन जाऊ देणार नसल्याचा इशारा नायब तहसीलदार कुलकर्णी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. सदर निवेदन देतेवेळी मनसे उपतालुकाध्यक्ष रघुनाथ मोहिते, महेश वारकर, विद्यार्थी जिल्हा संघटक बंटी भैय्या, हिंदू सम्राट संघटनेचे संस्थापक बापू काकडे, नवनाथ मोहिते, छोटू पठाण आदी मनसैनिक उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत