कोपरगाव/प्रतिनिधी:- यंदा देखील कोविडचे सावट असल्याने गणेशोत्सवावर राज्य सरकारकडून निर्बंध होते. दहा दिवस लाडक्या बाप्पाची मनोभावे पूजा-अर्चा...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
यंदा देखील कोविडचे सावट असल्याने गणेशोत्सवावर राज्य सरकारकडून निर्बंध होते. दहा दिवस लाडक्या बाप्पाची मनोभावे पूजा-अर्चा करून अनंत चतुर्दशीला निरोप देण्यात येतो. गेल्या वर्षी गणेश मूर्त्या पाण्यात फेकून देत असल्याची चित्रफीत पसरल्याने गणेश भक्तांच्या भावना दुखावल्या होत्या. मात्र, यावर्षी कोपरगाव पालिका, तहसील, पोलीस, स्वयंसेवी संस्था आणि पत्रकार यांच्या उत्कृष्ट समन्वयामुळे श्रींचे कोणताही अनुचित प्रकार न घडता व्यवस्थितरीत्या विसर्जन झाले, याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सतीश काकडे यांनी आभार मानले आहे.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियम पाळणे हाच एक सोपा उपाय आहे. त्यामुळे गर्दी होऊ नये आणि विसर्जनही व्यवस्थित व्हावे यादृष्टीने पालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी, शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, नगराध्यक्ष विजय वहाडणे यांसह स्वयंसेवी संस्था व पत्रकार यांनी उत्कृष्ट समन्वय साधून काटेकोर नियोजन केले होते. शहरातील कोणत्या भागातील नागरिकांनी कोणत्या ठिकाणी मूर्ती विसर्जन करावे याची आधीच कल्पना दिलेली होती. ठिकठिकाणी कृत्रिम तलाव तयार करून त्यात नदीचे पाणी सोडण्यात आले होते.
यामुळे भाविकांना दहा दिवस मुक्काम केलेल्या बाप्पांचे नदीच्या पाण्यात विसर्जन करण्याची अनुभूती मिळाली. परिणामी निर्विघ्नपणे श्रीगणेशाचे विसर्जन झाले. याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर व तालुक्याच्यावतीने शहराध्यक्ष सतीश काकडे यांनी प्रशासनाचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत