कोपरगाव प्रतिनिधी:- मागील महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे अनेक लाभधारक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सात नंबर पाणी मागणी अर्ज पाटबंधारे विभागाकड...
कोपरगाव प्रतिनिधी:-
मागील महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे अनेक लाभधारक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सात नंबर पाणी मागणी अर्ज पाटबंधारे विभागाकडे दाखल केले होते. मात्र मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना आवर्तनाची आवश्यकता भासणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असून पाटबंधारे विभागाने पाणी मागणी केलेल्या शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी आकारू नये अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी जलसंपदामंत्री ना.जयंतराव पाटील यांच्याकडे पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात आ.काळे यांनी असे म्हटले आहे की, जुलै-ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे परिस्थिती काहीशी चिंताजनक बनली होती. खरीपाचा हंगाम घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत पिके उभी केली मात्र पाऊस गायब झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. त्यामुळे गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे सात नंबर पाणी मागणी अर्ज दखल करून पाण्याची मागणी केली होती. परंतु मागील काही दिवसांमध्ये दमदार पाऊस झाल्यामुळे परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीपासाठी पाण्याची आवश्यकता भासणार नाही अशी परिस्थिती आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांची बहुतांशी पिके काही दिवसांनी काढणीला येणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज दाखल केले आहे त्यांच्याकडून पाणीपट्टी शुल्क आकारू नये अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी दिलेल्या पत्रात जलसंपदा मंत्र्यांना केली आहे.
तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. या धरणांमधून आजही हजारो क्युसेसने पाणी खाली जायकवाडी धरणामध्ये वाहून जात आहे. मात्र गोदावरी कालव्याच्या आवर्तनावर अवलंबून असणाऱ्या अनेक पाणी पुरवठा योजनांच्या साठवण तलाव व बंधाऱ्यामध्ये थोडाच पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे काही दिवसांनी पाणी टंचाई जाणवू शकते. त्यासाठी गोदावरी कालव्यांना सोडण्यात आलेल्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील सर्वच पाणी योजनांचे गावतलाव व साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून द्यावे अशी मागणी देखील आ.आशुतोष काळे यांनी दिलेल्या निवेदनात जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांच्याकडे केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत