कोपरगाव/प्रतिनिधी:- शहरात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रासपणे गोवंश हत्या होत आहे. याबाबत नागरिकांनी वारंवार आवाज उठविल्यानंतर अखेर कोपरगा...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
शहरात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रासपणे गोवंश हत्या होत आहे. याबाबत नागरिकांनी वारंवार आवाज उठविल्यानंतर अखेर कोपरगाव नगरपरिषद व शहर पोलिसांनी घेतली असून, शनिवारी (ता.30) सकाळी 11 वाजता संजयनगर भागातील अवैध कत्तलखाने चोख पोलीस बंदोबस्तात हटविण्यास प्रारंभ झाला आहे. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पालिकेने 26 ऑक्टोबरला कारवाईबाबत वर्तमानपत्रात जाहिरात देऊन संजयनगर, सुभाषनगर, आयशा कॉलनी, बैलबाजार रोड येथील अवैध कत्तलखाना चालकांना कळविले होते. त्यानुसार कारवाई पूर्वीच अवैध बांधकामे तत्काळ काढून घेण्याचे फर्मान काढले होते. मात्र तरी देखील हे कत्तलखाने काढलेले नव्हते. अखेर पालिकेने कठोर कारवाईचा बडगा उगारत शहर पोलिसांच्या मदतीने शनिवारी सकाळपासून धडक मोहीम सुरू केली. यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, भरत नागरे आदिंसह 5 अधिकारी, 40 ते 50 शहर, तालुका, शिर्डी सशस्त्रधारी पोलीस, पालिकेच्या विविध विभागाच्या विभागप्रमुखांसह 15 अधिकारी, 125 आरोग्य तर अन्य 110 स्वच्छता विभागाचे कर्मचारी सहभागी होते. दोन जेसीबी, 4 ट्रॅक्टर, 2 डंपर, 8 मालवाहू रिक्षा, 2 अग्निशामक बंब व पोलीस गाड्यांचा ताफा होता.
तीन वर्षांपूर्वी ऐन शिवरात्रीच्या दिवशी लाखो रुपयांचे गोवंशाचे मांस अहमदनगर येथील गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडले होते. त्यानंतर वारंवार पवित्र गोदावरीच्या पात्रत निष्पाप गोवंशांच्या रक्ताचा महापूर वाहत होता. याकडे शहर पोलीस व पालिका प्रशासन डोळेझाक करत असल्याचे आरोप विविध हिंदू संघटना व पदाधिकार्यांनी केला होता. त्याच्या निषेधार्थ कोपरगाव तालुका गोरक्षा समिती व हिंदुत्ववादी संघटनांनी 12 ऑक्टोबरला तहसील कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाचा जोरदार निषेध केला होता. यावर निर्णय घेण्यासाठी 31 ऑक्टोबरची अंतिम मुदत ठरवून दिली होती. मोठ्या शेडमधील कत्तली थांबलेल्या असल्या तरी कसायांनी शक्कल लढवत थेट आपल्या घरातच कत्तलखाने तयार करुन रक्ताचे पाट थेट गोदावरीत काढून दिले होते. याची नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी गंभीर दखल घेत शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना निवेदन पाठवून कारवाईची मागणी केली होती.
अखेर शनिवारी पालिकेने पोलिसांच्या मदतीने कारवाईचा बडगा उगारत चोख पोलीस बंदोबस्तात अवैध कत्तलखाने जमीनदोस्त करण्याची धडक मोहीम उघडली. या कारवाईचे शहरवासियांतून कौतुक होत असले तरी संबंधित प्रशासन जनक्षोभाची वाट बघत होते का? असा सवालही विचारला जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत