कोपरगाव/प्रतिनिधी:- राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतानाही सर्रासपणे गोवंश जनावरांची निर्दयीपणे वाहतूक व कत्तल होत असल्याचे प्रकार वारं...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतानाही सर्रासपणे गोवंश जनावरांची निर्दयीपणे वाहतूक व कत्तल होत असल्याचे प्रकार वारंवार निदर्शनास येत आहे. मंगळवारी (ता.19) रात्री अकरा वाजेच्या सुमारास कत्तलीसाठी ट्रकमधून जाणार्या तेवीस गोवंश जनावरांची कोपरगाव शहर पोलिसांनी मुक्तता केली आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करुन 12 लाख 64 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईचे नागरिकांनी कौतुक होत आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कोपरगाव शहरातून मालवाहू ट्रकमधून (क्र.एमएच.18, एए.0791) कत्तलीसाठी लहान-मोठ्या जनावरांना निर्दयीपणे बांधून वाहतूक करत होते. ही माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी तत्काळ सूत्रे फिरवत या ट्रकला पकडले. या ट्रकमधील 2 लाख 64 हजार रुपयांच्या निष्पाप गोवंश जनावरांची मुक्तता केली. तर जनावरांसह 10 लाख रुपयांचा ट्रक असा 12 लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई कैलास ढोकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रियाज अली लियाकत मुसलमान (वय 43, रा.कजगाव, ता.बडगाव, जि.जळगाव) व हाफिज रहेमान मोहम्मद जाबीर (वय 57, रा.मुन्शी शाबाननगर, ता.मालेगाव, जि.नाशिक) यांच्या विरोधात गुरनं. 317/2021 प्राण्यांस निर्दयीपणे वागविणे अधिनियम 1960चे कलम 11 (1), (अ), (ब) (ई) (फ), प्राण्यांचे परिवहन अधिनियम 1978चे कलम 47, मोटार वाहन अधिनियम 1954 कलम 183, 177, मुंबई पोलीस अधिनियम कलम 119 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
शहर पोलिसांच्या पथकाने धडक कारवाई करुन गोवंश जनावरांची मुक्तता केल्याने नागरिकांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशीच कारवाई सातत्याने सुरू ठेवून अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करावे, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. डी. आर. तिकोने हे करत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत