कोपरगाव/प्रतिनिधी:- राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतानाही पवित्र गोदातिरी वसलेल्या कोपरगाव शहरात सर्रासपणे गोवंशाची कत्तल होत आहे. याच...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतानाही पवित्र गोदातिरी वसलेल्या कोपरगाव शहरात सर्रासपणे गोवंशाची कत्तल होत आहे. याच्या निषेधार्थ गोरक्षा समिती व हिंदुत्वादी संघटनांनी मंगळवारी ता.12 सकाळी 11 वाजता एल्गार पुकारत पालिकेवर मोर्चा काढला. यावेळी पालिका, पोलीस व बाजार समितीला निवेदन तत्काळ अवैध कत्तलखाने बंद करुन निष्पाप गोवंशांची हत्या करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची जोरदार मागणी केली. 31 ऑक्टोबरपर्यंत अवैध कत्तलखाने बंदे केले नाही तर तेथेच आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
3 ऑक्टोबरच्या रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास धारणगाव रस्त्यावरील नागरे इंधन पंपासमोर शहर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत सिन्नर तालुक्यातील दहिवाडी येथील आरोपी गोवंशाने भरलेल्या टेम्पोसह ताब्यात घेतला होता. यापूर्वी देखील पोलिसांनी अनेकदा कारवाया करुन गोवंशांची हत्या करणाऱ्या कसायांना गजाआड केले आहे. तरी देखील दिवसेंदिवस मुक्या जिवांच्या हत्या काही थांबण्याचे नाव घेईनात. त्यांना निर्दयीपणे बिना चाऱ्यापाण्यापासून कसाई वाड्यात बांधून ठेवतात. याकडे पालिका व पोलिसांचे दुर्लक्ष होत असून, हत्या होण्यासह उरलेले मांस व रक्तामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. यामुळे संतप्त झालेल्या शहरवासियांसह गोरक्षा समिती, हिंदुत्वादी संघटना, शिवसेना, भाजप, मनसे आदी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्त्यानंतर तहसील कार्यालयानंतर नगरपरिषदेवर आपला मोर्चा वळवला.
याठिकाणी पालिका प्रशासन व पोलिसांचा निषेध करत दाटलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. नगराध्यक्ष विजय वहाडणे, गोरक्षा समितीचे अमित लोहाडे, कैवल्य जोशी, शिवसेनेचे शहराध्यक्ष कलविंदर दडियाल, वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड.जयंत जोशी, सुशांत खैरे, सेनेचे माजी शहराध्यक्ष भरत मोरे, संतोष गंगवाल, भाजपचे माजी शहर चिटणीस योगेश वाणी, बजरंग दलाचे दीपक सिनगर, योगेश भागवत, मनसेचे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड, गणेश शिंदे, मोतीराम निकम, राजेंद्र शुक्ला, सुशांत खैरे, शुभम गायकवाड आदिंसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी जर 31 ऑक्टोबरपर्यंत अवैध कत्तलखाने बंद केले नाही तर तेथेच तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. शेवटी नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी निवेदन स्वीकारले. आंदोलनास सर्वपक्षीयांनी सहभाग नोंदविल्याने सुनील फंड यांनी आभार मानले.
‘आंदोलनकर्त्यांची मागणी योग्य असून ती कायद्याच्या चौकटीत आहे. नगरपरिषद प्रशासनाने अवैध कत्तलखान्यांच्या इमारती पाडण्यासाठी पुढाकार घ्यावा, आम्ही त्यांना आवश्यक तेवढे पोलीस संरक्षण पुरवू. याकामी नगराध्यक्ष विजय वहाडणे आणि इतर पदाकिधाऱ्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा.
- वासुदेव देसले, कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत