कोपरगाव/प्रतिनिधी कोपरगाव शहरातील हनुमाननगर, इंदिरानगर, इंगळेनगर भागातील रहिवाशांना गेल्या चार वर्षांपासून मुलभूत सुविधांपासून वंचित ठेवले आ...
कोपरगाव/प्रतिनिधी
कोपरगाव शहरातील हनुमाननगर, इंदिरानगर, इंगळेनगर भागातील रहिवाशांना गेल्या चार वर्षांपासून मुलभूत सुविधांपासून वंचित ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी (ता.22) नगराध्यक्ष विजय वहाडणे आणि मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना निवेदन दिले.
सदर निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक दहामधील गटारींची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. गटारी असून नसल्या सारख्या झालेल्या आहेत. त्यामुळे गटारीचे पाणी नागरिकांच्या घरात जात आहे. दुर्गंधी पसरुन डासांचे प्रमाण देखील वाढले आहे. यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.
या संदर्भात पालिकेला 28 जून, 2021 रोजी नगरपरिषदेला निवेदन दिलेले असताना देखील कोणतेच काम झालेले नाही. येथील जनतेच्या समस्यांबाबत नगरपरिषद दखल घेत नाही. याशिवाय शिंदे घर ते अन्टी किराणा दुकान, सलीम मन्सुरी ते विघे घर, नवाब मन्सुरी ते सलीम मिस्तरी घर, विजय नरोडे ते रहमान पठाण यांच्या घरापर्यंत भूमिगत गटारी, रस्ते आदी सोयी झालेल्या नाहीत. स्वामी विवेकानंद नगरमधील संजीवनी ब्लड बँके समोरील रस्त्यावर झालेल्या काँक्रिटीकरणावर डांबरीकरण करण्याचा स्थानिक नगरसेवकांनी अजब प्रकार केला आहे. मात्र हनुमाननगर, इंदिरानगर, इंगळेनगर या भागात कोणत्याही प्रकारचे विकासकामे नगरसेवकाकडून झालेले नाही. याबाबत पालिकेला तोंडी व लेखी सूचना वारंवार देऊनही पालिका दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे ही कामे लवकरात लवकर करावी
अन्यथा येत्या दोन-तीन दिवसांत नागरिकांचा मोर्चा पालिकेवर घेऊन असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यक सेलचे शहराध्यक्ष जावेद शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शफीक शेख, सोशल मीडिया अध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के, संजय जगधने, रहेमान पठाण, युसूफ पठाण, बाबु शेख, काशिनाथ चव्हाण, रफीक पठाण आदिंनी दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत