राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील गुहा पाट येथे नगर-मनमाड मार्गावर कंटेनर- क्रूझर जीप व दोन दुचाकी यांच्यात गुरुवार १६ डिसेंबर र...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील गुहा पाट येथे नगर-मनमाड मार्गावर कंटेनर- क्रूझर जीप व दोन दुचाकी यांच्यात गुरुवार १६ डिसेंबर रोजी रात्री विचित्र अपघात झाला असून या अपघातात क्रूझर जीपमधील परराज्यातील ३ साई भक्त ठार झाल्याची माहिती असून अन्य गंभीर जखमींवर नगर येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते
नगर-मनमाड रस्त्याचे काम सुरु असल्याने गुहा परिसरात एकेरी वाहतूक सुरू असल्याने हा भीषण अपघात झाला असून या अपघातात परराज्यातील शिर्डी साई भाविकांच्या क्रूझर जीपमधील एक महिला व २ पुरुष ठार झली असल्याची माहिती समजते. अन्य गँभीर जखमीवर नगर, राहुरी येथे उपचार सुरू आहेतजखमींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे समजते. त्यांच्यावर अहमदनगर नगर येथे उपचार सुरू आहेत. दुचाकीस्वार राहुरी येथील विनोद जगताप हा गँभीर जखमी आहे. त्याच्यावर नगर येथे उपचार सुरू आहेत.
क्रूझर जीप मधील सर्व प्रवासी हे परराज्यातील साई भक्त आहेत. त्यांची नावे व पत्ता मात्र समजू शकला नाही. कंटेनर चालक हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
अपघातातील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याकामी राहुरी, देवळाली प्रवरा, लोणी येथील रुग्णवाहिका तातडीने दाखल झाल्या होत्या. अपघात समयी शिर्डी संस्थांनचे विश्वस्त सुरेश वाबळे, अविनाश ओहळ, चंद्रकांत थोरात, विकी लांबे, रामा बर्डे, सागर सोनवणे ,अमोल सोनवणे, अमर वाबळे, शरद वाबळे, चिंचोलिचे सरपंच गणेश हारदे, देवळालीचे नगरसेवक आदिनाथ कराळे यासह गुहा, चिंचोली, देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी येथील नागरिकांनी मदत केली.
घटनास्थळी वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली असताना राहुरीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने परिश्रम घेतले.
गुहा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका असून अडचण नसून खोळंबा
अपघाताची भिषणता लक्षात घेताच राहुरी तालुक्यातील सर्व रुग्णवाहिका तातडीने अपघात स्थळी दाखल झाल्या. मात्र गुहा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका जवळ असून ती या ठिकाणी आली नाही. अर्धा किलोमीटर अंतरावर अपघात होऊन जर शासकीय रुग्णवाहिका येऊ शकत नसेल तर तिचा उपयोग काय असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
पैशासाठी 'त्या' डॉक्टरकडून जखमी रूग्णांची अडवणुक, नगरसेवकाकडून मदतीचा हात
गुहा येथील या अपघातातील दोन जखमींना प्राथमिक उपचारासाठी राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गालगतच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु त्या जखमींची प्रकृती चिंताजनक होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी नगर येथे हलविण्याची गरज असताना सदर डॉक्टरने आधी माझे १३ हजार बिल भरा, तरच रुग्ण घेऊन जा अशी भूमिका घेतली. पैशासाठी 'त्या' डॉक्टराने दोन्ही जखमींना तासभर ताटकळत ठेवले.
या दोन्ही जखमीबरोबर कोणीही सोबत नव्हते. अन्य जखमी नगरला उपचारासाठी दाखल असल्याने सर्व काही अशक्य होते. डॉक्टर पैशाच्या भूमिकेवर ठाम होते. त्याचवेळी माणुसकी दाखवत देवळाली प्रवराचे नगरसेवक ज्ञानेश्वर वाणी यांनी व्यक्तीक १० हजार रुपये भरून दोन जखमी रुग्णांना पुढील उपचारासाठी नगरला हलविले.
राहुरी फॅक्टरी येथील सदर हॉस्पिटलमधील डॉक्टर नेहमी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत अनेक रुग्णांच्या तक्रारी आहेत. आजही पैशासाठी रुग्णांची अडवणूक केल्याने नागरीकांनी संताप व्यक्त केला. पैसे दिल्यानंतर 'त्या' डॉक्टरचा उर्मटपणा सुरूच होता.
रुग्णांची कायम अडवणुक करणाऱ्या 'त्या' डॉक्टरवर तातडीने कारवाई करा अशी मागणी राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष विकी पंडित यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत