कोपरगाव / प्रतिनिधी:- कोपरगावकरांचा मान आणि नाव या कोरोनाच्या वाईट काळातही सुरभीमुळे भारतभर नव्हे तर जगभर गेले. सुरभीचे कार्य आणि तिच्या आई...
कोपरगाव / प्रतिनिधी:-
कोपरगावकरांचा मान आणि नाव या कोरोनाच्या वाईट काळातही सुरभीमुळे भारतभर नव्हे तर जगभर गेले. सुरभीचे कार्य आणि तिच्या आईवडीलांचा ध्यास हा तरुण पिढीसाठी प्रेरणादायी राहील, असे गौरवोद्गार कोपरगावचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी काढले.
सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या इंडियन आयडॉल मराठी या संगीत कार्यक्रमामध्ये कोपरगावच्या सुरभी कुलकर्णी हिची टॉप-14 मध्ये निवड झाली आहे. याबद्दल सुरभीचा कोपरगावकरांच्यावतीने राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराजांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या संगीत कार्यक्रमासाठी सुमारे 8 हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. त्यातून मुंबई व पुणे याठिकाणी अनेक निवड चाचण्या घेण्यात आल्या. या निवडचाचणीच्या अनेक फेर्यांमधून, परीक्षक सुप्रसिध्द संगीतकार अजय-अतुल, सुप्रसिध्द पार्श्वगायिका बेला शेंडे यांनी सुरभीची निवड केली. परीक्षकांनी तिच्या आवाजाचे व वैविध्यपूर्ण गायनाचे कौतुक केले व तिला व्हर्साटाईल सिंगर म्हणून शाबासकीची थाप देत गोल्डन माईक देवून गौरविले. अहमदनगर जिल्ह्यातून या कार्यक्रमासाठी सुरभी ही एकमेव स्पर्धक असल्याने तिचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल, साधना सरगम, उत्तरा केळकर, प्रसिध्द गायक व मिमिक्री आर्टिस्ट सुदेश भोसले यांसारख्या मान्यवरांसमोर सुरभीचे गायन सादर झाले. तिला संगीताचे शिक्षण शारदा संगीत विद्यालयाचे संचालक आई दीपाली कुलकर्णी व वडील केतन कुलकर्णी यांच्याकडून मिळाले. सुगम संगीत गायनाबरोबर शास्त्रीय संगीत गायनाचे धडे देखील तिने घेतले आहेत. सुरभी गायनाबरोबर उत्कृष्ट हार्मोनियम व गिटार वादन देखील करते. सध्या कोपरगाव येथील संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत