देवळाली प्रवरा /प्रतिनिधी:- देवळाली प्रवरा येथील एका सावकाराच्या घरावर राहुरीचे सहाय्यक निबंधक यांच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात...
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी:-
देवळाली प्रवरा येथील एका सावकाराच्या घरावर राहुरीचे सहाय्यक निबंधक यांच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात छापा मारला असता काही दस्तऐवज व मोठी रोकड सापडली असल्याचे समजते. याबाबत राहुरीचे सहाय्यक निबंधक दीपक नागरगोजे यांच्याशी वेळोवेळी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे 'त्या' सावकाराच्या घरावर छापा मारून कोणती कागदपत्रे व किती रोख रक्कम सापडली याबाबत निश्चित माहिती मिळू शकली नाही. ही कारवाई प्रसार माध्यमांपासून अंधारात ठेवल्याने कारवाई गुलदस्त्यात राहते की काय अशी शंका यावेळी व्यक्त केली जात आहे.
देवळाली प्रवरा येथील संदीप कदम या तरुणाने दिनांक १२ जानेवारी रोजी खासगी सावरकरांच्या जाचास कंटाळून विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्या सावकारा विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तालुक्यातील विविध संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.वंचित बहुजन आघाडी या संघटनेने राहुरी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची दखल घेऊन राहुरीचे नायब तहसीलदार पूनम दंडिले यांनी दि.14 रोजी आत्महत्या ग्रस्त तरुणाचा जबाब नोंदवून घेऊन राहुरी पोलीस ठाण्याकडे पाठविला होता.राहुरी पोलिसांनी त्या जबाबाच्या आधारे राहुरीचे सहाय्यक निबंधक यांना पत्र देऊन खासगी सवकारकी बाबत फिर्याद दाखल करण्याचे सांगितले होते.त्यापूर्वीच राहुरीचे सहाय्यक निबंधक दीपक नागरगोजे यांच्यासह राहुरीचे तहसीलदार फसीयोद्दीन शेख व काही शासकीय कर्मचारी यांना घेऊन 'त्या' सावकाराच्या घरी मंगळवारी सकाळी 10 वा.छापा मारला त्याच बरोबर राहाता व राहुरी येथील 'त्या' सावकाराच्या कार्यालयावर छापा मारण्यात आला.विविध प्रकारचे कागदपत्रे घरून व कार्यालयातून जप्त करण्यात आले आहे.या छाप्यात राहुरी, राहाता,नगर व बीड येथील सहाय्यक निबंधक व त्यांचे आधिकारी सहभागी झाले होते.
सहाय्यक निबंधक नागरगोजे यांनी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ही कारवाई केली असून या कारवाईत काही दस्तऐवज व मोठी रोख रक्कम सापडली आहे असे समजते. मात्र सहाय्यक निबंधक नागरगोजे यांनी प्रसार माध्यमांना माहिती देण्याचे टाळून प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचा एकही फोन त्यांनी स्वीकारला नाही.त्यामुळे उशिरा पर्यंत या कारवाईत नेमके काय घडले हे मात्र समजू शकले नाही. झालेली कारवाई प्रसार माध्यमांतून लपवून ठेवल्याने ती गुलदस्त्यात राहते की काय अशी शंका निर्माण होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत