कोपरगाव / प्रतिनिधी:- शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था काम करते. यामध्ये नागरिकांचा सहभाग देखील महत्वाचा असतो. त्यासाठ...
कोपरगाव / प्रतिनिधी:-
शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था काम करते. यामध्ये नागरिकांचा सहभाग देखील महत्वाचा असतो. त्यासाठी पालिकेला विविध कर भरुन सहकार्य करणे आवश्यक असते. त्यानुसार सध्या कोपरगाव शहरवासियांचा कर भरण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी दिली.
मालमत्ता कर, पाणीपट्टी, व्यवसायिक व इतर आस्थापनेवर आकारण्यात येणारा प्रत्येक कर रक्कमेची वसुली झाल्यानंतर त्या रक्कमेची शहरांमधील सोई-सुविधा वाढवण्यासाठी उपयोग केला जातो. जर शहरातील नागरिकांनी आकारणी योग्य कर वेळेत स्थानिक स्वराज्य संस्थेकडे जमा केला नाही तर शहरातील नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधा विद्युत, स्वच्छता, रस्ते बांधकाम, पाणी व इतर सुविधा पुरवण्यासाठी प्रशासनाला अडचणी निर्माण होतात. परिणामी शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर तसेच एकूणच दैनंदिन जीवनावर प्रतिकूल परिणाम होत असतो ही बाब लक्षात घेऊन कोपरगाव नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरामधील नागरिकांची घरपट्टी व पाणीपट्टी, व्यवसायिक गाळाधारकाची कर वसुलीची मोहीम खूप यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे नऊ जणांचे पथक तयार करण्यात आले आहेत. सदर पथक नियुक्त केलेल्या विविध भागांमध्ये नागरिक व व्यवसायिक यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी संवाद साधून नळपट्टी, घरपट्टी, व्यवसायिक कर पालिकेला जमा करण्यासंदर्भात आवाहन करत असून त्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
तरी अद्याप ज्या नागरिकांनी आपली घरपट्टी, नळपट्टी, व्यावसायिक गाळा कर नगरपरिषद कार्यालयाकडे जमा केलेले नाही, अशा सर्व जबाबदार नागरिकांनी आपल्याकडील येणे बाकी असलेली सर्व कर रक्कम विहित वेळेत भरावी व प्रशासनाला सहकार्य करावे. जेणेकरून कुठलीही कारवाई करण्यास प्रशासनाला भाग पाडू नये आणि आपल्याकडे येणाऱ्या करवसुली पथकास सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासक तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत