सात्रळ, दि. २८ : विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अध्ययन व संशोधन करत असताना प्रवरा शैक्षणिक संकुलाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा लाभ घेतला पा...
सात्रळ, दि. २८ :
विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अध्ययन व संशोधन करत असताना प्रवरा शैक्षणिक संकुलाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा लाभ घेतला पाहिजे. कुठलीही कीटकनाशके किंवा रासायनिक खते न वापरता आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे संशोधन केले आहे. संशोधन हे नाविन्यपूर्ण व समाजाभिमुख असावे, असे मत प्रतिपादन पीव्हीपी कॉलेज, प्रवरानगर येथील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख व संशोधन मार्गदर्शक प्रो. डॉ. अनिल सोपानराव वाबळे यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या विभागीय ग्रंथालयाने आयोजित केलेल्या 'विज्ञान साहित्य' विषयक ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करून झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. सोमनाथ घोलप होते. विज्ञान मंडळाचे समन्वयक प्रो. डॉ. बाबासाहेब सलालकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. दीपक घोलप, प्रा. दिनकर घाणे, डॉ. भाऊसाहेब नवले, प्रो. डॉ. शिवाजी पंडित आदी उपस्थित होते.
यावेळी प्रोफेसर डॉ. सोमनाथ घोलप म्हणाले, भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते भारतीय शास्त्रज्ञ भारतरत्न चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारी हा 'राष्ट्रीय विज्ञान दिन' साजरा होतो. याच तारखेला रामन यांनी 'रामन-परिणाम' हा शोधनिबंध 'नेचर' या जगप्रसिद्ध मासिकाला प्रसिद्धीसाठी पाठवला होता. डॉ. वसंत गोवारीकर यांनी या राष्ट्रीय दिन सोहळ्याचा प्रारंभ केलेला आहे.
कार्यक्रमाची सुरुवात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील, डॉ. सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमापूजन व दिपप्रज्वलन करून झाली. याप्रसंगी बोलताना डॉ. वाबळे म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान या विषयांमध्ये गोडी आणि विज्ञान विषयक संशोधन याविषयीची आवड निर्माण व्हावी हाच ह्या कार्यक्रमाचा उद्देश आहे. अंधाऱ्या खोलीतील एखादी वस्तू शोधायची म्हणजे संशोधन. याकरिता संशोधन कर्त्यास शोध विषयाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. विविध संशोधन पद्धती वापरून संशोधकास ठाम निष्कर्षापर्यंत आपणास पोहोचता आले पाहिजे. संशोधनाचा फाॅर्मूला शेती, माती, मानवी आरोग्य व निसर्ग पूरक असावा.
याप्रसंगी कु. हारदे तेजस्विनी महादेव, होले वैष्णवी शंकर, अनाप ऋषिकेश रमेश, बेलकर वैष्णवी संदीप, मनसुरी जजनाब सिराज, गागरे पूनम लक्ष्मण, गावडे गायत्री विश्वनाथ या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शोधनिबंधाचे सादरीकरण केले. याप्रसंगी झालेल्या प्रश्नोत्तर चर्चेद्वारे विद्यार्थ्याच्या मनातील शंकांचे निरसन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार डॉ. निलेश कान्हे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. दीप्ती आगरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. रामदास बोरसे, प्रा. आदिनाथ दरंदले, मजिद शेख, रमेश डोके, बाळासाहेब विखे यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत