कोपरगाव / प्रतिनिधी:- सध्या कोपरगाव नगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम जोरात सुरू केलेली आहे. यामुळे अतिक्रमणधारकांची चांगलीच तारांबळ उडत असल...
कोपरगाव / प्रतिनिधी:-
सध्या कोपरगाव नगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम जोरात सुरू केलेली आहे. यामुळे अतिक्रमणधारकांची चांगलीच तारांबळ उडत असल्याचे चित्र दिसत असताना शहरातील जिओ कार्यालयाजवळील एका अतिक्रमणधारकाने पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (ता.२४) दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास घडला आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम सध्या सुरू आहे. या कारवाईत जिओ कार्यालयाजवळील अतिक्रमणधारक अलीम छोटू शहा (रा.निंभेरा मैदान) याने पथकास 'तुम्ही माझे अतिक्रमण काढू नका, तुम्ही जर अतिक्रमण काढले तर तुमच्याकडे पाहून घेतो असे' धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणला. या प्रकरणी पालिकेचे अधिकारी सुनील आरण यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अलीम शहा याच्या विरोधात पोलिसांनी गुरनं.७०/२०२२ भादंवि कलम ३५३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भरत दाते हे करीत आहे. दरम्यान, या घटनेने अतिक्रमणधारकांत एकच खळबळ उडाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत