" खूप थकायला झालंय... चला मॅडम तुम्हाला ' ग्रॅज्युएट चहा ' पाजते...!" या वाक्यांनी मला थोडं आश्चर्य वाटलं आणि म...
" खूप थकायला झालंय... चला मॅडम तुम्हाला ' ग्रॅज्युएट चहा ' पाजते...!" या वाक्यांनी मला थोडं आश्चर्य वाटलं आणि मी क्षणात विचारलं ग्रॅज्युएट चहा....??हे काय प्रकरण आहे...आणि तिथेच का...?काय विशेष आहे त्या चहात...? अशा अनेक प्रश्नांची मालिकाच सुरू झाली. यावर त्या म्हणाल्या अहो थांबा थांबा मॅडम ...आपण तिथे जाऊ म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांची उकल तत्काळ होईल...माझीही उत्सुकता शिगेला पोहचली होती...काय? कुठे?कसे?अशा अनेक प्रश्नांसोबत आम्ही श्रीरामपूर मधील " ग्रॅज्युएट चहा"
मध्ये पोहचलो. तिथली गर्दी पाहून मी अवाकच झाले. आरोग्यदायी गुळाचा ग्रॅज्युएट चहा पिऊन प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान दिसत होतं, सगळ्यांचा थकवा भुर्रर्र कण उडून गेल्या सारखा वाटत होता आणि चहा पिणारा प्रत्येक जण तृप्त होऊन बाहेर पडत होता.आम्ही देखील मोठ्या उत्साहात चहाची ऑर्डर दिली आणि चहाची वाट पाहू लागलो तो पर्यंत तिथे लावलेल्या विविध बोर्डनी आमचं लक्ष वेधून घेतलं. ग्रॅज्युएट स्पेशल लस्सी , बीएससी लस्सी , मॅट्रिक मट्टा अशी अफलातून वेगळी नावं आणि वरती बोर्डवर लिहिलं होतं फोनवर लस्सी व मठ्ठा ऑर्डर वर मिळेल.....त्याच्या शेजारीच मिशन आणि व्हिजन लिहिले होते ...यात व्हिजन होते "आपला ऑनलाईन चहा भारतातल्या प्रत्येक शहरामध्ये पोहचविणे " आणि मिशन
" आमच्या प्रत्येक ग्राहकाला स्वछतेत उत्तम दर्जाचा चहा त्याच बरोबर घरपोच सेवा देत आमच्या प्रत्येक ग्राहकाचा वेळ वाचविणे हेच आमचे ध्येय" असं काहीतरी वेगळं त्या ठिकाणी दिसलं....माझी उत्सुकता आणखी वाढली आणि माझ्या शोधक नजरेला आणखी एक फलक तिथे दिसला त्याच शीर्षक होत..." कपभर चहाचा खडतर प्रवास ".... पटपट मी वाचायला लागले आणि तेव्हा मला समजले या ग्रॅज्युएट चहाचा खडतर प्रवास
ग्रामीण भागातील अत्यंत सामान्य कुटुंबातील काही ग्रॅज्युएट झालेली मुले, परिस्थिती थोडी बेताचीच त्यातही कोरोनाच संकट , या संकटावर मात करून आपल्या घरच्यांना आर्थिक मदत करावी म्हणून दूध डेअरी मध्ये काम त्यातून मार्ग निघेना म्हणून गाया वाढवू हा विचार केला, सुरुवातही झाली पण फायदा काहीच झाला नाही मग पुन्हा नवीन विचार करून ऑनलाईन केक विकू असं ठरल पण तेही शक्य झालं नाही पण काहीतरी ऑनलाईन आणूच असा विचार केला आणि सगळं ऑनलाईन विकत पण फक्त चहा ऑनलाईन विकला जात नाही हे ध्यानात आलं आणि निर्णय घेतला ..."चहा ऑनलाईन विकायचा....."
निर्णय झाला.... पण ग्रॅज्युएट मुलं चहा विकणार हा मोठा हास्याचा विषय झाला , घरच्यांचा विरोध झाला, नातेवाईकांनी विरोध केला, मित्रांनी हसू केलं ...पण आम्ही मात्र ठाम ठरवलं होतं आपण सर्वांनी म्हणजेच ग्रॅज्युएट झालेल्या सर्व मित्रांनी मिळून ग्रॅज्युएट चहा ऑनलाईन विकायचा... आम्ही ठाम निर्णय घेतला आणि निश्चित केलं आपण चहा विकायचा बरेच जण म्हणाले तुम्ही चहा विकला तर तुम्हाला लग्नासाठी मुली मिळणार नाहीत पण तरीही आम्ही ठरवलं आणि भारतातील पहिला ऑनलाइन चहा साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीरामपूर भूमीत सुरू केला....वाचता वाचता अंगावर रोमांच उभे राहिले आणि मी उठून आत गेले आणि विचारले या ग्रॅज्युएट चहाचे निर्माते कोण आहेत? तसा आतून एक तरुण पटकन बाहेर आला अगदी २४/२५ वर्षाचा, साधा, सरळ आणि अगदी हसतमुख. तो म्हणाला मी राजेंद्र नामदेव लांडे.
माझीच ही संकल्पना. तो बोलत असतानाच त्याचे इतरही काही मित्र जे त्याच्या सोबत काम करत होते ते तिथे जमा झालेत...तो सांगत होता आम्ही सर्वानी मिळून हा थोडा वेगळा विचार केला, अनेकांनी आम्हाला वेड्यात काढले पण आम्ही आमच्या निर्णयावर ठाम होतो....आज श्रीरामपूर सारख्या शहरात आमचा चहा सर्वात प्रसिद्ध आहे.लांबलांबचे लोक इथे चहा प्यायला येतात आणि आमच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन जातात.... त्याच सगळ बोलणं ऐकताना त्या सर्वांचाच अभिमान वाटत होता....आज काल शिकलेली मुलं व्यसनाच्या आहारी जातात , काम करायला लाजतात, त्यांना आरामाची सवय लागते , ती नको त्या मार्गाला लागतात पण या ध्येयवेड्या मुलांची कथा काही औरच आहे....ती साधी पण कष्टाळू, ग्रामीण भागात राहणारी पण भविष्याचा वेध घेणारी , शिक्षित पण श्रमाच मोल जाणणारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नव्याचा वेध घेताना जुन्याला सोबत घेऊन जाणारी ध्येयवेडी मुलं..... त्यांची संघर्ष कथा ऐकताना नकळत त्यांच्या प्रती वाटणारा आदर वृद्धिंगत झाला आणि आमच्या आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन श्री. धनराजजी विसपुते जे पदवीधरांसाठी कार्य करतात त्यांच्या वतीने आम्ही राजेंद्रचा सत्कार केला , त्याला शुभेच्छा दिल्या आणि त्याचे आभार ही मानले कारण आज खऱ्या अर्थाने पदवीधर युवकांनी कोणाला आदर्श मानावे या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले होते....आज पदवीधरांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आहे, त्यांना नोकरी, व्यवसाय या सगळ्याच्या समस्या आहेत. पण प्रत्येकाने राजेंद्र सारखा विचार केला तर नक्कीच तरुण बेरोजगार राहणार नाही तो स्वावलंबी होईल आणि यामुळे आपला देशही आत्मनिर्भर बनेल......राजेंद्र आणि त्याच्या ध्येयवेड्या सर्व ग्रॅज्युएट मित्रांना आणि त्यांच्या कार्याला सलाम आणि शुभेच्छा......
डॉ.सीमा कांबळे
प्राचार्य
9921709207
श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन न्यू पनवेल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत