कोपरगाव / प्रतिनिधी:- येथील नगरपालिका हद्दीतील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा दिला आहे. त्याम...
कोपरगाव / प्रतिनिधी:-
येथील नगरपालिका हद्दीतील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सदरहू व्यावसायिक अतिक्रमणधारकांची अतिक्रमणे कायम करावी, अशी मागणी माजी शिवसेना शहरप्रमुख सनी वाघ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनात म्हंटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून कोविडचे संकट सुरू आहे. त्यात मध्यंतरी शासनाने टाळेबंदी लागू केली होती. यामुळे अनेक आस्थापनांवर निर्बंध आले होते. त्यामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. अनेकांवर तर उपासमारीची वेळ आली होती. त्यानंतर निर्बंध शिथिल होऊन व्यवसाय पूर्वपदावर आले. मात्र, नगरपालिकेने पोलीस बंदोबस्त घेऊन २३ मार्च, २०२२ रोजी अतिक्रमण मोहीम राबवली. यात चारशे ते पाचशे व्यावसायिक उध्वस्त झाले.
या कारवाईनंतर उदरनिर्वाह करण्यासाठी रहदारीस अडथळा होणार नाही अशा ठिकाणी पुन्हा व्यवसाय सुरू केले. त्यावर नगरपालिकेने तीन दिवसांच्या आत आपले अतिक्रमण काढले नाही तर पुन्हा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत शहरात ठिकठिकाणी फलकही लावले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा व्यावसायिक उध्वस्त होण्याची शक्यता आहे.
याची माजी शिवसेना शहरप्रमुख सनी वाघ यांनी दखल घेत जेथे वाहतूक कोंडी होत आहे तेथील अतिक्रमण अवश्य काढावे. मात्र, राजकीय सूडापोटी कारवाई करू नये. यामुळे व्यावसायिक हतबल झाले असून, कायद्याच्या चौकटीत त्यांचे अतिक्रमण कायम करावे आणि माणुसकीच्या दृष्टीकोनातून दिलासा द्यावा, अशी मागणी वाघ यांनी केली आहे. सदर निवेदन राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना निवेदन दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत