राहुरी : वेबटीम गेल्या दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यावर्षी आपल्या लाडक्या पांडुरंगाच्या भेटीसाठी उंबरे येथून 30 जून रोजी पायी दिंडीतून अ...
राहुरी : वेबटीम
गेल्या दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यावर्षी आपल्या लाडक्या पांडुरंगाच्या भेटीसाठी उंबरे येथून 30 जून रोजी पायी दिंडीतून असंख्य वारकऱ्यांचे श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
वै रघुनाथ महाराज उंबरेकर व वै लक्ष्मण महाराज उंबरेकर यांच्या कृपा आशीर्वादाने, वै भाऊसाहेब शेजुळ यांच्या प्रेरणेने, गुंजाळ भाऊसाहेब यांच्या अधिपत्याखाली व हभप बाळासाहेब महाराज डेंगळे यांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र उंबरे ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले आहे. गुरुवार दि 30 जून रोजी सकाळी 11 वाजता उंबरे हनुमान मंदिरापासून या दिंडीचे प्रस्थान होणार आहे. 10 दिवस मजल दरमजल करत हा सोहळा 9 जुलै रोजी पंढरपूर मुक्कामी पोहचणार आहे, या कालावधीत ठिकठिकाणी भाविक भक्तांनी चहापाणी, अन्नदान व्यवस्था केलेली आहे. दिंडी व्यवस्थापकांनी तसे नियोजन केले आहे. 10 जुलै रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे एकादशी फराळ कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्यानंतर हा सोहळा परतीचा प्रवास करेल . या अदभुत सोहळ्यात हभप भाऊसाहेब शेजुळ ( दादा) यांची कमतरता पदोपदी जाणवेल, असे त्यांचे वारकरी बांधव आवर्जून सांगतात.
वास्तविकता..., तुळशी माळ घातलेल्या वारकरी भक्तांचा जीव विठ्ठल भेटीसाठी कासावीस झाला आहे. कोरोनामुळे दोन वर्षे वारी बंद असल्याने दरवर्षी विठ्ठलाच्या भेटीसाठी जाणारे भक्त तळमळत होते. पण परमेश्वरी इच्छा मान्य केली. मन विठ्ठल भेटीसाठी आसुसलेलेच. शेतशिवारात.. कुठल्याही कामात मन रमेना. डोळ्यांसमोर दिसायचे ते चंद्रभागेचे वाळवंट. कारावास भोगावा अशी दोन वर्षे गावाची वेससुद्धा माझ्या वारकऱ्यांनी ओलांडली नाही. पण भक्तांनी विठुरायचे नामस्मरण मात्र अखंड सुरूच ठेवले. आता मात्र भक्तांवरील संकट दूर करीत भेटीसाठी कासावीस भक्तांना हा वैकुंठीचा राया मूळ रुपात दर्शनासाठी सिद्ध झालाय, आणि.. आणि इच्छापूर्ती झाल्याने भक्त अत्यानंदाने पंढरपूरकडे निघालेत. उंबरे येथूनही शेकडो वारकरी दिंडीत जाण्यासाठी तयारीला लागले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत