देवळाली प्रवरा नगरपालिका रणसंग्राम २०२२ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा नगरपालिका रणसंग्राम २०२२

  देवळाली प्रवरा/वेबटीम:- देवळाली प्रवरा नगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या १८ ऑगस्ट रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.१०...

 देवळाली प्रवरा/वेबटीम:-


देवळाली प्रवरा नगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या १८ ऑगस्ट रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.१० प्रभागातून २१ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. भाजप विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आरपीआय व इतर मित्र पक्ष असा सामना यंदाच्या निवडणूकित रंगण्याची चिन्हे आहेत. निवडणूक जाहीर होताच भाजपच्या नेत्यांनी तातडीची बैठक घेऊन व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे.तर काँग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेना,आरपीआयच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी निवडणूकीच्या रिंगणात उतरण्यासाठी तयारी सुरू केली आहे.


गेल्या पंचवार्षिक मध्ये देवळाली प्रवरा नगरपरिषदेत भाजपची एकहाती सत्ता होती तर राष्ट्रवादी व सेनेच्या रूपाने प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आला मात्र सत्ताधाऱ्यांना पुरेपूर विरोध करण्यास दोघेही अपयशी ठरले होते. दरम्यानच्या काळात बऱ्याच राजकिय घडामोडी घडल्या. भाजप कडून निवडून गेलेले ४ नगरसेवक यांनी मावळते नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करून राष्ट्रवादीशी घरोबा केला. आपल्यावर नाराज होऊन ४  नगरसेवक राष्ट्रवादीच्या गोटात गेल्याची चिंता कदमांनी न करता आपला विकासकामांचा तडाखा सुरूच ठेवला.


गेल्या महिन्यात देवळाली प्रवरा विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजप तथा कदम पिता- पुत्रांनी तयार केलेल्या देवळाली प्रवरा विकास मंडळाला पायउतार करण्यासाठी काँग्रेस,राष्ट्रवादी शिवसेना,आरपीआयच्या नेत्यांनी एकत्रित येऊन लोकसेवा मंडळाच्या माध्यमातून मोट बांधली. मात्र या निवडणुकीत सभासदांनी लोकसेवेच्या परिवर्तनाला साथ न देता कदम पिता-पुत्रांवर विश्वास ठेवून विकास मंडळाच्या सर्वच्या सर्व १३ जागा निवडून दिल्या.


भाजप तथा कदम गटाला सोसायटीतून थोपवण्यासाठी विरोधकांनी केलेला प्रयत्न पुर्णपणे अपयशी ठरला. आपसुख देवळाली प्रवरात भाजपचाच वरचष्मा पहावयास मिळाला. या पराभवाचा विरोधकांनी चांगलाच धसका घेतला. याचवेळी भाजप कडून निवडुन आलेले व नंतर राष्ट्रवादीशी हातमिळवणी केलेल्या माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे, आदिनाथ कराळे, बाळासाहेब खुरुद,ज्ञानेश्वर वाणी यांनी आपण आगीतून उठून फुपाट्यात तर पडलो नाही ना? अशा विचारात आहे.


सोसायटी निवडणूकीनंतर या चार नगरसेवकांनी एकत्रित येऊन लोकसेवा मंडळाचे नेतृत्व करणाऱ्या काही नेत्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. पालिका निवडणूकिवेळी तुम्ही मंडळाच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असाल तर आम्ही तयार नाही पक्ष म्हणून निवडणूकिला सामोरे जाणे गरजेचे आहे असे जाहीर बोलून दाखवले.



दरम्यान शुक्रवारी सायंकाळी राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच देवळालीतील व राहुरी फॅक्टरी परीसरातील इच्छुक उमेदवारांनी कंबर कसली आहे. काही झालं तरी पालिकेतून सत्ता जाऊन द्यायची नाही, तगडे उमेदवार देऊन पुन्हा विजयश्री खेचून आणायचा यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तात्काळ मावळते नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांनी बागायत पीक सोसायटीत प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली. या बैठकीला माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, भाजप शहराध्यक्ष अजित चव्हाण आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. दिवस हातात कमी आहे,सोसायटीच्या विजयाने हवेत जाऊ नका, कामाला लागा, असे फर्मान कदम यांनी सोडल्याचे समजते.


 दुसरीकडे काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना एकत्रित येऊन निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा केली.तर राष्ट्रवादी तथा तनपुरे गटाला मानणारे अण्णासाहेब चोथे,अशोक खुरुद,अरुण ढुस, दीपक त्रिभुवन यांनी राहुरीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या  उपस्थितीत राहुरीत पार पडलेल्या मेळाव्यास हजेरी लावून दादा देवळालीत पण लक्ष घाला अशी मागणी केल्याचे सुत्रांकडून समजते.शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील कराळे यांनी शिवसेना कोणाच्या नादी लागणार नाही. आम्ही स्वबळावर लढविणार असे बोलून दाखविले.


येत्या १८ ऑगस्टला होणाऱ्या देवळाली प्रवरा नगरपालिकेसाठी सत्ताधारी भाजप सह विरोधक तयारीला लागले असून भाजपला रोखण्यासाठी एकत्रित येऊन मंडळाच्या माध्यमातून निवडणूक लढणार की,जो तो आपल्या पक्षाचा पॅनल करुन निवडणूकीला सामोरे जाणार याकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले असून सर्व चित्र येत्या १० दिवसांत अर्थात उमेदवारी दाखल करण्यास होण्याच्या कालावधी दरम्यान स्पष्ट होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत